उल्हासनगर : बदलापूरमध्ये चिमुकलींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर विशेष तपास पथकाने (एसआयटी) याप्रकरणी शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्याच्या कलम २१ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी शाळेच्या प्रशासनाला मुलींच्या शोषणाची माहिती दिल्यानंतरदेखील त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली नाही, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ‘पोक्सो’ कायद्याच्या कलम २१ नुसार, कोणत्याही व्यक्तीला लैंगिक अत्याचाराबद्दल माहिती मिळाल्यास ती पोलिसांना त्वरित कळवणे आवश्यक आहे. मात्र, शाळा प्रशासनाने हा कायदा पाळला नाही. त्यामुळे ‘एसआयटी’ने तातडीने हालचाल करून शाळेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
बदलापूर शहरातील नागरिक आणि राज्यातील विरोधी पक्षनेते याप्रकरणी शाळा प्रशासनाविरुद्ध कारवाईची मागणी करत होते. त्यानंतर ‘एसआयटी’ने तत्काळ हालचाल करून पीडित मुली आणि त्यांच्या पालकांचे जबाब नोंदवले. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने जाऊन पुरावे गोळा केले आहेत. तपास पथक शाळेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यासाठी सकाळी १० वाजता शाळेत दाखल झाले आणि तपास सायंकाळपर्यंत सुरू होता.
गुरुवारी मुंबई हायकोर्टाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेऊन पीडितांच्या तक्रारींनंतरही शाळेविरुद्ध तत्काळ कारवाई का झाली नाही, अशी विचारणा केली. यानंतरच पोक्सो कायद्यांतर्गत शुक्रवारी शाळेवर कारवाई करण्यात आली.
बालहक्क आयोगाकडून तपास सुरू
या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा रूपाली बॅनर्जी सिंग यांनी शुक्रवारी बदलापुरात येऊन तब्बल ६ तास सखोल चौकशी केली. या चौकशीत शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांची कसून चौकशी करण्यात आली.
वादग्रस्त वक्तव्यावर मुख्याध्यापिकेंचे मौन
या सर्व घटनाक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिकेंचे एक वादग्रस्त विधान उघड झाले आहे. चौकशीदरम्यान त्यांनी मुलीला झालेली जखम सायकल चालवतानासुद्धा होऊ शकते, असे असंवेदनशील विधान केल्याचा आरोप आहे. या विधानामुळे पालकवर्गात प्रचंड नाराजी आहे. चौकशीच्या वेळी मुख्याध्यापिकेंना या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी मौन राखणे पसंत केले. त्यामुळे याप्रकरणी तणाव वाढला आहे.