

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. केंद्रीय निवडणूक आयोगाने जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी राखून ठेवलेले शिटी हे निवडणूक चिन्ह बहुजन विकास आघाडीला देण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि न्यामूर्ती न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने हा आदेश देत याचिका निकाली काढली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ३० जानेवारी २०२४ रोजी पत्र जारी करून जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी शिटी हे निवडणूक चिन्ह राखून ठेवले. यामुळे वाद निर्माण झाला. या परिपत्रकाला आक्षेप घेत बहुजन विकास आघाडी पक्षाच्यावतीने अॅड. यश देवल यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
या याचिकेवर सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि न्यामूर्ती न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली. यावेळी अॅड. दातार आणि अॅड. देवल यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्राला आक्षेप घेतला. २००९ पासून गेली १५ वर्षे शिटी चिन्हाचा वापर बहुजन विकास आघाडी महाराष्ट्रात करीत आहे. या चिन्हावर आमचे आमदार-खासदार निवडून आले. पालघर जिल्ह्यात आमचे तीन आमदार आहेत. २०१८ मध्ये लोकसभा निवडणुकीत शिटी चिन्ह मिळून नये म्हणून विरोधकांनी प्रयत्न केले, मात्र २०१९ ची विधानसभा निवडणूक शिटीवर लढविली याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.
यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने अॅड. अक्षय शिंदे यांनी जनता दल (युनायटेड) पक्षाने नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्रात निवडणूक लढविणार नसल्याचे पत्र पाठवून शिटी चिन्ह परत करीत असल्याची माहिती दिली. याची दखल घेत खंडपीठाने याचिका निकाली काढली.