आश्रमशाळेतील २८२ शिक्षकांची पदे भरणार, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत ९७७ आश्रमशाळा
आश्रमशाळेतील २८२ शिक्षकांची पदे भरणार, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

नागपूर : राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत ९७७ आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळेतील विज्ञान आणि गणित विषयाच्या २८२ शिक्षकांची रिक्त पदे लवकरच भरली जातील, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याशिवाय विभागाच्या ७२ आश्रमशाळा येत्या जानेवारी महिन्यात सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांचे अनुदान प्रलंबित असल्याबाबत काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सावे यांनी आश्रमशाळांना शालेय पोषण, इमारत भाडे आणि वेतन अशा तीन भागात अनुदान दिले जाते. त्यासाठी यावर्षी २२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून १८० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित निधीची तरतूद पुरवणी मागणीत करण्यात आली असून या निधीचेही वाटप लवकर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आधार योजना आणि परदेशात शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीबाबत प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना सावे यांनी आश्रमशाळांमधील रिक्त पदे त्वरित भरण्यात येतील, असे सांगितले. तसेच इतर मागास प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही त्यांच्यासाठी थेट लाभ देण्याच्या ‘आधार’ योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात ६०० अशा एकूण २१ हजार ६०० विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. परदेशी शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या आता ५० वरून ७५ इतकी करण्यात आली आहे. आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे, असेही सावे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in