बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात ‘एनडीए’ येथे गुरुवारी बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला उशिरा आमंत्रण दिले तसेच व्यासपीठावर जागा देणार नसल्याचे आयोजकांनी सांगितले असून, हा पेशव्यांच्या वंशजांचा अपमान आहे.
बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार
Published on

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात ‘एनडीए’ येथे गुरुवारी बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला उशिरा आमंत्रण दिले तसेच व्यासपीठावर जागा देणार नसल्याचे आयोजकांनी सांगितले असून, हा पेशव्यांच्या वंशजांचा अपमान आहे. त्यामुळे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे मस्तानी यांचे वंशज नवाब शदाब अली बहादूर पेशवा, नवाब ऑफ बांदा यांनी म्हटले आहे. पेशव्यांच्या पुण्यातील वंशजांना व्यासपीठावर जागा आहे, मात्र आपल्याला खाली बसविण्यात येणार असल्याने आपण नाराज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याबाबतचे पत्रक शादाब अली यांनी बुधवारी माध्यमांना दिले. शादाब अली हे बाजीराव पेशवा आणि मस्तानी यांचे आठवे वंशज आहेत. ते म्हणतात, ‘सध्याचे बाजीराव पेशव्यांचे पुण्यातील वंशज रघुनाथ राव हे वाराणसी येथून भासकुटे परिवाराकडून दत्तक घेतले गेले आहेत. त्यामुळे मीच खरा बाजीराव पेशव्यांचा रक्त वंशज आहे. माझ्या पूर्वजांच्या बलिदानाचा गौरवशाली इतिहास आहे. माझे पूर्वज समशेर बहादूर यांनी (१७६१) पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांच्यावतीने सहभाग घेतला. सत्ताविसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. माझे पणजोबा नवाब अली बहादूर १८५७ मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना साथ देत लढाई लढले. या सर्व गौरवशाली इतिहासाकडे ‘थोरले बाजीराव पेशवा प्रतिष्ठान समिती’चे कुंदन कुमार साठे आणि सहकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. दत्तक वंशजांना मानाचे स्थान देत, व्यासपीठावर स्थान दिले आहे. मात्र, मला या कार्यक्रमांचे आमंत्रणदेखील दोन दिवसांपूर्वी देण्यात आले असून, आपल्याला व्यासपीठावर बसवता येणार नाही, असे सांगितले आहे.

या माध्यमातून ऐतिहासिक सत्य दडपण्याचा आणि अमित शहा यांना भरकटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहा हे इतिहासप्रेमी असून, त्यांनी यावर पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. श्रीमंत बाजीराव पेशवा आणि मस्तानी साहिबा प्रेम आणि बलिदान यांचे प्रतीक आहेत. आम्ही अशा प्रकारे आमचा अपमान सहन करू शकत नाही.

आम्हीच बाजीरावांचे रक्त वंशज!

आमच्या गौरवशाली इतिहासाचा सन्मान करावा, ही आमची मागणी आहे. आम्हीच बाजीराव पेशव्यांचे रक्त वंशज असून, यासाठी आम्ही ‘डीएनए’ चाचणी करायला तयार आहोत. तसेच या अपमानामुळे आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in