औरंगजेबाच्या कबरीला एसआरपीएफचे कवच; कबर उद्ध्वस्त करण्याचा बजरंग दल, विहिंपचा इशारा

प्रत्यक्ष 'कारसेवा' कृती करण्याचा इशारा बजरंग दलाने दिला आहे. ही कारसेवा आयोध्येतील ६ डिसेंबर १९९२ प्रमाणे असेल असेही बजरंग दलाने स्पष्ट केले.
औरंगजेबाच्या कबरीला एसआरपीएफचे कवच; कबर उद्ध्वस्त करण्याचा बजरंग दल, विहिंपचा इशारा
IANS
Published on

छत्रपती संभाजीनगर: बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी करून इशारा दिल्याने या कबरीजवळच्या बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे.

'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांना किती निघृणपणे ठार मारण्यात आले ते पाहून संतापही व्यक्त होत आहे. काही दिवसापूर्वी औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारने देखभालीसाठी पॅकेज जाहीर केले. तर दुसरीकडे औरंगजेबाकडून अत्याचाराच्या झालेल्या इतिहासाची आठवण घेत काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. तसेच, या संघटनांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये कबरीच्या ठिकाणी दोन पोलीस अधिकारी आणि १५ कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी शनिवारी कबरीच्या आतील बाजूची पाहणी केली. तसेच कबरीच्या दोन ठिकाणी नाकाबंदी केली आहे. दोन ठिकाणी फिक्स पॉइंट लावले आहेत. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून ही कबर हटविण्याची मागणी करत इशारा देण्यात आल्याने येथील बंदोबस्त वाढविण्यात आला असून एसआरपीएफच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.

कबर नष्ट करण्यासाठी 'कारसेवा' करण्याचा बजरंग दलाचा इशारा

जिहादी मानसिकतेच्या औरंगजेबाच्या कबरीचे राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांनी अस्तित्व ठेवू नये, अन्यथा प्रत्यक्ष 'कारसेवा' कृती करण्याचा इशारा बजरंग दलाने दिला आहे. ही कारसेवा आयोध्येतील ६ डिसेंबर १९९२ प्रमाणे असेल असेही बजरंग दलाने स्पष्ट केले.

बजरंग दलाच्या महाराष्ट्र-गोवा क्षेत्राचे संयोजक विवेक कुलकर्णी यांनी हा इशारा दिला आहे. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री शरद नगरकर यावेळी उपस्थित होते. स्थानिक प्रजेला अत्यंत पीडा देणारा, अन्यायी, दुराचारी, राष्ट्राचा शत्रू असणाऱ्या औरंगजेबाची कबर अस्तित्वात असणे ही एक प्रकारची मानसिक गुलामगिरी असल्याचा दावाही विवेक कुलकर्णी यांनी केला.

सोलापूरमध्ये १३ जणांविरोधात कारवाई

दरम्यान, औरंगजेबाच्या सन्मानार्थ सोशल मीडिया स्टेटस पोस्ट केल्याबद्दल सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांसह तेरा जणांवर गुन्हा दाखल केले आहेत. अधिकाऱ्यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in