"बीडमध्ये इनकॅमेरा फेरमतदान घ्या..." बजरंग सोनवणेंचं निवडणूक आयोगाला पत्र

काल बीडमधील अनेक मतदानकेंद्रांवर बोगस मतदान झाल्याची तक्रार बजरंग सोनावणे यांनी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. अनेक मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदारांना मतदान करू दिलं नसल्याचंही त्यांनी या तक्रारीत म्हटलं आहे.
बजरंग सोनवणे
बजरंग सोनवणे प्रातिनिधीक फोटो
Published on

बीड: देशभरात सोमवारी (१३ मे) लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्पाचं मतदान पार पडलं. महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातही काल मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदारसंघात महायुतीकडून भाजपच्या कमळ चिन्हावर पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर बजरंग सोनावणे निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. दरम्यान काल बीडमधील अनेक मतदानकेंद्रांवर बोगस मतदान झाल्याची तक्रार बजरंग सोनावणे यांनी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. अनेक मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदारांना मतदान करू दिलं नसल्याचंही त्यांनी या तक्रारीत म्हटलं आहे. असे प्रकार घडलेल्या सर्व मतदानकेंद्रावर इनकॅमेरा फेरमतदान घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

इनकॅमेरा मतदान घेण्याची केली होती विनंती:

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र लिहून काल बीड लोकसभा मतदारसंघात मतदानादरम्यान घडलेल्या गैरप्रकारांबाबत माहिती दिली. परळी व इतर मतदार संघातील काही मतदान केंद्रावर इनकॅमेरा मतदान घेण्याची विनंती आपण निवडणूक निरीक्षकांना ९ मे २०२४ रोजी केली होती, परंतु त्यांनी याबाबतीत कोणताही निर्णय घेतला नाही व तसं कळविले नाही, असं सोनवणेंनी या पत्रात म्हटलं आहे.

मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान-

त्यानंतर १३ मे २०२४ रोजी मतदान सुरू झाल्यानंतर एका तासातच परळी मतदारसंघातील इंजेगाव, सारडगाव, धर्मापुरी, डिग्रस, नाथ्रा, कौडगाव, सावळा जिरेवाडी, वालेवाडी, कन्हेरवाडी या गावातील मतदान केंद्र तसेच मतदान केंद्र १८८, १८९, १३२, १६१ तसेच केज तालुक्यातील देवगाव, लाडेवडगाव याशिवाय माजलगावमधील गोविंदवाडी तसेच धारूरमधील सोनिमोहा, पिंपरवडा, मैंदवाडी व चाडगाव तसेच आष्टीमधील वाली आणिपाटोद्यातील वाघीरा ही सर्व मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान केले गेल्याची तक्रार केली आहे.

लोकशाही वाचवावी...

आपण याबाबत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस अधिक्षक बीड यांना बोगस मतदान थांबवण्याची विनंती केली, मात्र त्याची कोणीही दखल घेतली गेली नसल्याचं सोनवणे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. याशिवाय काही मतदान केंद्रावर मुस्लीम आणि मागासवर्गीय मतदारांना मतदान करू न दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

वरील घटना गंभीर, असंवैधानिक, गुन्हेगारी स्वरूपाच्या असून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या आहेत, असं म्हणत वरील सर्व मतदान केंद्रांवर इनकॅमेरा फेरमतदान घ्यावं आणि लोकशाही वाचवावी अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in