
समाजसुधारक प्रबोधकार ठाकरे यांची मुलगी, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची बहीण संजीवनी करंदीकर यांचे शुक्रवारी सकाळी वयाच्या ८४ वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
संजीवनी करंदीकर या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सेक्शन अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. जवळपास ३८ वर्षे त्यांनी सेवा बजावली. यानंतर त्या निवृत्त झाल्या होत्या. त्यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी आंतरजातीय विवाह केला. प्रबोधनकार ठाकरे यांना एकूण आठ अपत्ये होती. त्यात बाळासाहेब ठाकरे यांचा पाचवा तर संजीवनी यांचा सातवा क्रमांक होता.
शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या, ‘‘संजीवनी करंदीकर यांचे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी दीर्घकाळ शिवसेनेचा प्रवास जवळून पाहिला. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या निधनामुळे शिवसेना परिवाराची हानी झाली आहे.
संजीवनी करंदीकर यांची मुलगी आणि शिवसेना चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीस कीर्ती पाठक म्हणाल्या, स्वाभिमानाने जीवन कसे जगावे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आई होती. तिने एक डायरी केली होती, ज्यात तिने अत्यसंस्काराची देखील तजवीज करुन ठेवली होती. आम्हाला कसलाही त्रास होऊ नये, याची तिने काळजी घेतली होती. तिचे आयुष्य आम्हाला प्रेरणादायी होते.