बुलढाण्यात ‘टक्कल व्हायरस’चा धुमाकूळ; तीन दिवसांत डोक्यावरील केस गायब

जगासह आता राज्यात ‘एचएमपीव्ही’ व्हायरसचा शिरकाव होताना सर्वत्र काळजी घेतली जात आहे. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात सध्या ‘टक्कल व्हायरस’ने धुमाकूळ घातला आहे.
बुलढाण्यात ‘टक्कल व्हायरस’चा धुमाकूळ; तीन दिवसांत डोक्यावरील केस गायब
Published on

बुलढाणा : जगासह आता राज्यात ‘एचएमपीव्ही’ व्हायरसचा शिरकाव होताना सर्वत्र काळजी घेतली जात आहे. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात सध्या ‘टक्कल व्हायरस’ने धुमाकूळ घातला आहे. शेगाव तालुक्यात असणाऱ्या बोंडगाव, कालवड आणि कठोरा या गावांमध्ये केसगळतीच्या आजाराची दहशत पसरली आहे. प्रथम लोकांच्या डोक्याला खाज सुटत असून त्यानंतर तीन दिवसांत संपूर्ण टक्कल पडत आहे. या आजाराची दखल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतली असून गावात आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीजवळील बोंडगाव, कालव आणि हिंगणा या गावांमध्ये अनेकांना या अज्ञात आजाराने ग्रासले आहे. येथील ग्रामस्थांच्या डोक्याला अचानक खाज सुरू होते. यानंतर केसगळती होऊन केस गळून पडतात आणि तीन दिवसांत टक्कल पडत आहे. या आजाराचा धसका परिसरातील सर्व नागरिकांनी घेतला आहे. बोंडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कालवड येथे १३ नागरिकांना तर कठोरा येथील ७ नागरिकांना हा आजार झाला असून त्यांना पूर्ण टक्कल पडले आहे. मुले-मुली, वृद्ध महिला आणि पुरुष या सर्वांना हा त्रास झाला आहे. त्यामुळे बुलढाण्यात नवा व्हायरस पसरला की काय, अशी लोकांच्या मनात धडकी भरली आहे.

स्थानिक आरोग्य विभागाने याबाबत सर्वेक्षण करून, अचानक सुरू झालेल्या या केसगळतीची कारणे शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शेगाव तालुक्यातील सहा गावांमध्ये हा त्रास प्रामुख्याने आढळून आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक नागरिकांनी केसगळतीची तक्रार केल्यानंतर भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वचारोगतज्ज्ञ आणि इतर डॉक्टरांनी पाहणी केली.

विहिरीच्या पाण्यावर संशय

गावांमध्ये केस गळण्याचे प्रमाण दूषित पाणी किंवा जास्त पाण्यामुळे असू शकते. सर्व रुग्ण बोअरवेलच्या पाण्याने आंघोळ करत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच शाम्पू वापरल्यामुळे असा प्रकार घडत असावा, असे काही डॉक्टरांचे मत आहे. पण कधीही आयुष्यात शाम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in