

पेण : पेण तालुक्यातील वरसई भागात होणाऱ्या बाळगंगा धरणाचे काम अद्यापही अपूर्णच आहे. गेल्या १६ वर्षांपासून प्रतीक्षेत असणारा बाळगंगा धरण पूर्ण होणार तरी कधी याचीच चिंता येथील नागरिकांना लागून राहिली आहे. धरणाच्या रखडलेल्या कामामुळे येथील स्थानिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
राज्यातील नवी मुंबई विभागाला पाणीपुरवठा करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामध्ये वरसई भागात बाळगंगा धरणाची निर्मिती करण्यात आली. यात जवळपास येथील सहा ग्रामपंचायतींमधील नऊ महसुली गावे आणि तेरा आदिवासी वाड्यांचा समावेश आहे. या प्रकल्पात तीन हजारांहून अधिक कुटुंबे विस्थापित होत आहेत. धरणाच्या कामाला आजपर्यंत सोळा वर्षे पूर्ण होत आली असतानाही साधारणपणे ८० टक्के काम पूर्ण झाले असून अद्याप २० टक्के काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे एकीकडे नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचे काम पूर्ण होत असताना बाळगंगा धरणाचे कामही तितक्याच जबाबदारीने शासनाने पूर्ण करावे अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.
बाळगंगा धरण प्रकल्पाचे काम मागील १६ वर्षांपासून रखडले आहे. येथील लोकप्रतिनिधींना हा प्रश्न सोडवता आला नाही हे त्यांचे अपयश आहे. एकतर शासनाचे धोरण आधी पुनर्वसन मग धरण अशी वस्तुस्थिती असतानाही आजपर्यंत काम अपूर्ण आहे. कोर्टाच्या आदेशानुसार भूसंपादन कायदा २०१३ नुसार भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन योग्य मोबदला मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्तांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तर दुसरीकडे होणाऱ्या विलंबामुळे प्रकल्पावारील खर्चाची रक्कम सुद्धा वाढत आहे. प्रकल्पाची किंमत २ हजार ५०० कोटी हून अधिक झाली आहे. एवढे असूनही आतापर्यंत पुनर्वसन व धरण दोन्ही झालेले नाही. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न शासनाला सोडवता येत नसतील तर शेतकऱ्यांच्या जागा परत करून धरण रद्द करावा अशी मागणी करण्यात येत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे म्हणाल्या.