मारकडवाडीतील ‘पोलखोल’ अखेर रद्द; पोलीस-प्रशासनाचा दबाव, ग्रामस्थ घेणार होते मतपत्रिकेवर फेरमतदान

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे मंगळवारी मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घेण्यात येणार होते, मात्र एका मतदाराने जरी मतदान केले तरी संबंधितांवर गुन्हे नोंदविले जातील आणि मतपेट्या जप्त केल्या जातील, असा इशारा पोलीस आणि प्रशासनाने दिल्याने अखेर या गावात मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय ग्रामस्थांना रद्द करावा लागला.
मारकडवाडीतील ‘पोलखोल’ अखेर रद्द; पोलीस-प्रशासनाचा दबाव, ग्रामस्थ घेणार होते मतपत्रिकेवर फेरमतदान
Published on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे मंगळवारी मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घेण्यात येणार होते, मात्र एका मतदाराने जरी मतदान केले तरी संबंधितांवर गुन्हे नोंदविले जातील आणि मतपेट्या जप्त केल्या जातील, असा इशारा पोलीस आणि प्रशासनाने दिल्याने अखेर या गावात मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय ग्रामस्थांना रद्द करावा लागला.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही अद्याप निकालावरील गोंधळ कमी झालेला नाही. विरोधकांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला असून ठिकठिकाणी फेर मतमोजणीसाठी अर्ज केलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला असून पुन्हा एकदा मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनी या मतदानासाठी पुढाकार घेतला होता, त्यांनीच आता माघार घेण्याची घोषणा केली आहे.

मारकडवाडी या गावातून भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांना अधिकची मते मिळाली, असा आरोप निकालानंतर करण्यात येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी ईव्हीएमवर संशय घेत, पुन्हा एकदा मतदान घेण्याची मागणी केली होती. त्यामुळेच मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घेण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र मंगळवारी मतदानाबाबतची प्रक्रिया सुरू केल्यानंतर प्रशासनाने त्याला विरोध केला. तसेच एक जरी मतदान टाकले गेले तर आम्ही मतपेट्या जप्त करून गुन्हा नोंदवू, अशी धमकीही पोलीस प्रशासनाने दिली.

मतदान रद्द झाल्यानंतर उत्तम जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पोलीस प्रशासनाने जप्तीची कारवाई करणार असल्याचे सांगितले. पोलिसांनी आधीच प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी चर्चा करून मतदान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस जर मतदानच करू देणार नसतील आणि पेट्या उचलून नेणार असतील तर मतदान करण्याला अर्थ नाही. त्यामुळे आम्ही काही दिवसांत हजारो लोकांचा मोर्चा काढून आमचा आवाज उठविणार आहोत, असे ते म्हणाले.

जानकर पुढे म्हणाले, या गावातून मला १४००, तर विरोधी उमेदवारांना ५०२ इतके मतदान झाले आहे. आम्ही सर्व माहिती घेतली आहे. तरीही विरोधी उमेदवाराला १००३ मतदान दाखविले गेले आहे. ईव्हीएममध्ये दुप्पट मते जात आहेत. त्यामुळे उत्तम जानकरला मिळालेले मतदान मशीनमधून भाजपच्या उमेदवाराला कसे गेले, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही मतपत्रिकेवर निवडणूक घेत होतो.

माळशिरसच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी सोमवारी २ ते ५ डिसेंबर या कालावधीसाठी या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. मतपत्रिकांचा वापर करून फेरमतदान घेण्याची ग्रामस्थांची मागणी तहसीलदार विजया पांगारकर यांनी फेटाळली. मतदान शांततेत पार पडले, मतदान अथवा मतमोजणीच्या वेळी कोणीही आक्षेप घेतला नाही. असे असताना आता मतपत्रिकेद्वारे मतदान घेणे बेकायदेशीर आहे, असे पांगारकर यांनी म्हटले आहे.

मारकडवाडी येथील मतदान केंद्र क्रमांक ९६, ९७ आणि ९८ अशी तीन केंद्रे आहेत. या तीनही मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या प्रक्रियेत कोणतीही विसंगती आढळलेली नाही. मतदानाच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर उमेदवारांचे 'पोलिंग एजंट' उपस्थित होते आणि त्यांच्याकडून कोणतीही तक्रार आलेली नाही, असे पांगारकर यांनी सांगितले.

'मतमोजणीच्या वेळी देखील उमेदवारांचे काऊंटिंग एजंट उपस्थित होते. त्यांच्याकडूनही मतमोजणी दरम्यान किंवा नंतरही कोणताही आक्षेप नोंदवण्यात आलेला नाही. तसेच फेर मतमोजणीची कोणतीही मागणी झाली नाही. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार पारदर्शकपणे पार पडल्यानंतरच निकाल घोषित झाला आहे', असे निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर म्हणाल्या.

ग्रामस्थांना ईव्हीएमवर संशय

या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उत्तम जानकर आणि भाजपचे राम सातपुते यांच्यात लढत झाली होती. त्यामध्ये जानकर यांना ८४३, तर सातपुते यांना १००३ मते मिळाल्याचे स्पष्ट झाले. पण या निकालाला गावातील बहुतांश मतदारांनी विरोध करत त्यांनी उत्तम जानकर यांनाच मतदान केल्याचा दावा केला. त्यामुळे या गोष्टीची खात्री पटावी म्हणून ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर फेरमतदान करण्याचा निर्णय घेतला होता.

आमच्या गावातून भाजपला मतदान होऊच शकत नाही

आमच्या गावातून भाजपला ऐंशी टक्के मतदान होऊच शकत नाही. ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आहे. भलेही आमचा उमेदवार जिंकू देत, पण आमच्या गावातून त्याला कमी झालेले मतदान हा आमच्या स्वाभिमानावर लागलेला कलंक आहे. आमचे गाव गद्दारी करणार नाही आणि गद्दारांना साथ देणार नाही ही अस्वस्थता मन खाऊ लागली. शेवटी सगळ्या गावाने ठरवले की आपल्यापुरते मतपत्रिकेवर मतदान घेऊया. किमान आपल्या काळजाला लागलेली टोचणी तरी थांबेल, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

हुकूमशाही भित्री असते - किरण माने

दरम्यान, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते किरण माने यांनी मारकडवाडीच्या ग्रामस्थांचे कौतुक केले आहे. हुकूमशाही भित्री असते, फक्त तिच्यावर चाल करून जायला असे निधड्या छातीचे, ताठ कण्याचे, सत्यवचनी बाण्याचे लोकशाहीचे खंदे सुपुत्र लागतात. भले ते हुकूमशहांच्या ‘सो कॉल्ड’ महाशक्तीपुढे संख्येने कमी असतील, पण ते या सैतानाच्या टोळीला घाम फोडू शकतात, अशी पोस्ट किरण माने यांनी सोशल मीडियावर लिहिली आहे.

निवडणूक आयोगाचे बिंग फुटण्याची भीती - पटोले

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश हे राज्यातील जनतेच्या पचनी पडलेले नाही. त्यामुळे राज्यभरातून ईव्हीएमविरोधात आवाज उठवला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीतील ग्रामस्थांनी ईव्हीएमविरोधात आवाज उठवला असून मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून गावकऱ्यांना मतदान करू दिले नाही. मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही, तर मग मारकडवाडीत मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला प्रशासन का घाबरले? असा सवाल करत निवडणूक आयोगाचे बिंग फुटेल म्हणूनच गावकऱ्यांना मतपत्रिकेवर मतदान करू दिले नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in