

कोल्हापूर : बाळूमामांच्या नावानं चांगभलं... हालसिद्धनाथांच्या नावानं चांगभलं... अशा अखंड जयघोषात आणि सुमारे दोनशे पोती भंडाऱ्याच्या उधळणीत मेतके (ता. कागल) येथे श्री हालसिद्धनाथ व बाळूमामा भंडारा उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. ढोलांच्या धीरगंभीर दणदणाटात झालेल्या या सोहळ्यास महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशातून सुमारे दोन लाख भाविकांची मांदियाळी लाभली.
मूळ क्षेत्र मेतके येथे सद्गुरू बाळूमामांनी १९३२ साली श्री हालसिद्धनाथ मंदिराची स्थापना करून या भंडारा महोत्सवाची सुरुवात केली होती. आज हा उत्सव अत्यंत भव्य स्वरूपात साजरा केला जातो. विविध तीस-पस्तीस गावांतील वालंग ढोलवादन पथके यावेळी सहभागी झाली होती. उत्सवाची सुरुवात मंदिरातील पालखी पूजनाने झाली. त्यानंतर देवाची सभिना (पालखी सोहळा) निघाली. अखंड ढोलवादन आणि भंडाऱ्याची उधळण यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. मध्यवर्ती चौकात पालखी भेटीचा हृद्य सोहळा पार पडला. रात्रभर 'हेडाम'चा खेळ व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी जागर रंगला.
बाळूमामा, त्यांचे सद्गुरू मुळे महाराज तसेच श्री विठ्ठल-रखुमाई यांच्या गाभाऱ्याची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मुरगूड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
या प्रसंगी प.पू. भगवान गिरी महाराज, ट्रस्टचे कार्याध्यक्ष पापा पाटील-कौलवकर, अध्यक्ष आर. डी. पाटील, सदस्य बाबासाहेब पाटील, देवाप्पा पुजारी, दयानंद पाटील, बळीराम मगर, पद्मजा तिवले आदी उपस्थित होते. सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्ट, उत्सव समिती, तरुण मंडळे, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांनी सोहळ्याचे नेटके नियोजन केले.
सारे गाव पिवळेधमक...
कागल तालुक्यातील चिकोत्रा काठावर वसलेले मेतके हे छोटेखानी गाव बाळूमामांच्या ख्यातीमुळे सर्वदूर प्रसिद्ध झाले आहे. उत्सवासाठी आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची इतकी उधळण केली की गल्ल्या, रस्ते आणि मध्यवर्ती चौक पूर्णपणे पिवळेधमक झाले होते. काही ठिकाणी भंडाऱ्याचा थर साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.