

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६७ वा दीक्षांत समारंभ राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. ४ नोव्हेंबर) विद्यापीठाच्या नाट्यगृहात संपन्न झाला. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात आला. मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे (आयसीटी) कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, लोकभवनचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कुलसचिव डॉ. संजय कवडे, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे यांच्यासह विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
पदवी घेऊन विद्यापीठातून बाहेर पडताना विद्यार्थ्यांचे विद्यापीठाशी असलेले नाते बदलणार आहे. आता ते विद्यापीठाचे भागीदार बनणार असून, स्वतःच्या ध्येयाचे शिल्पकारही आपणच आहोत, याची जाणीव त्यांनी ठेवावी, असे आवाहन प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांनी केले. प्राप्त झालेली पदवी हे अंतिम ध्येय नसून जीवनप्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांनी
जीवनात मिळविलेले यश विद्यापीठासाठी अभिमानास्पद ठरेल, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. दीक्षांत मिरवणुकीने मान्यवरांचे सभागृहात आगमन झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. कुलपतींनी दीक्षांत समारंभ सुरू झाल्याची घोषणा केली.
त्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र, मानव्यविद्या आणि आंतरविद्याशाखांतील पदव्यांचे वाचन संबंधित अधिष्ठात्यांनी केले. प्रारंभी वंदे मातरम्, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. डॉ. मुस्तजीब खान आणि डॉ. गणेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
३३४ संशोधकांना पीएच.डी. पदवी
यंदाच्या दीक्षांत समारंभात एकूण ३३४ संशोधकांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. ६ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पीएच.डी. प्राप्त केलेल्या संशोधकांचा यात समावेश आहे. यामध्ये मानव्यविद्या शाखेतील १३१, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील १२४, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र शाखेतील ३१ आणि आंतरविद्याशाखेतील ४८ संशोधकांचा समावेश आहे, अशी माहिती परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी दिली.याशिवाय ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मधील १० हजार ३३१, मार्च-एप्रिल २०२६ मधील ५५ हजार २५५ आणि विद्यापीठ परिसरातील १ हजार ६३९ पदवीधारक अशा एकूण ६७ हजार ५५९ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
कुलगुरूंच्या कार्यकाळातील चौथा दीक्षांत सोहळा
कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी २४ जानेवारी २०२४ रोजी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यकाळातील हा चौथा दीक्षांत समारंभ ठरला. यापूर्वी १३ जून २०२४ रोजी ६४ वा, २२ फेब्रुवारी २०२५ रोजी ६५ वा आणि ५ जानेवारी रोजी ६६ वा दीक्षांत समारंभ पार पडला होता. यंदाच्या ६७ व्या दीक्षांत सोहळ्याने त्यांच्या कार्यकाळातील आणखी एका महत्त्वपूर्ण टप्प्याची नोंद झाली.