मुंबई : राज्यात पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या ईद मिलाद उन-नबीनिमित्त १६ आणि १७ सप्टेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमध्ये डीजे तसेच लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घाला, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील झुबेर अहमद, नजीर अहमद पीरजादे यांच्यासह ज्येष्ठ मुस्लिम बांधवांच्या वतीने अॅड. ओवेस पेचकर यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर सोमवार, ९ सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
इस्लाममध्ये पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस ईद मिलाद उन-नबी म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने मुस्लिम बांधवांच्या घरी तसेच धार्मिक ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात येते. तसेच मिरवणुका काढल्या जातात. मात्र गेल्या काही वर्षांत या मिरवणुकीचे स्वरूप पालटले असून मिरवणुकांमध्ये डीजे आणि प्रखर दिव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या मिरवणुकीत मुस्लिम तरुण डीजेच्या ठेक्यावर बेधुंद होऊन नाचताना दिसतात. हा सर्व प्रकार मुस्लिम धर्माची शिकवण, तत्त्वे आणि विचारांच्या विरोधात असल्याचा दावा केला आहे.