कृत्रिम फुलांच्या वापरावर लवकरच बंदी; फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची माहिती

कृत्रिम फुलांमुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी विधानसभेत सदस्य महेश शिंदे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. यावेळी पावसाळी अधिवेशन संपण्याआधी पर्यावरण मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सभागृहाला दिली.
कृत्रिम फुलांच्या वापरावर लवकरच बंदी; फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची माहिती
Published on

मुंबई : कृत्रिम फुलांमुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी विधानसभेत सदस्य महेश शिंदे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. यावेळी पावसाळी अधिवेशन संपण्याआधी पर्यावरण मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सभागृहाला दिली. दरम्यान, अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी सर्वपक्षीय विधानसभा सदस्यांनी सोमवारी सभागृहात लावून धरली.

विधानसभा सदस्य महेश शिंदे म्हणाले की, प्लास्टिक फुलांच्या निर्मितीत वापरला जाणारा टिटॅनियम ऑक्साईड मानवी आरोग्यासाठी घातक आहे. युरोपीय देशांनी कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घातली आहे, पण महाराष्ट्रात कृत्रिम फुलांचा सर्रास वापर सुरू आहे.

कृत्रिम फुलांमुळे सध्या फुलशेती धोक्यात आली आहे. तसेच मधमाश्यांचे अस्तित्व आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्यात अडचण काय, असा सवाल विधानसभा सदस्य कैलास पाटील यांनी यावेळी केली.

फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी

राज्यातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. कृत्रिम फुलांचा वाढता वापर शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण चालू ठेवण्यासाठी कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी यावेळी केली, तर पावसाळी अधिवेशनात कृत्रिम फुलांचा वापर व विक्रीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार नारायण कुचे यांनी केली. यावर याच आठवड्यात पर्यावरण मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन भरत गोगावले यांनी सदस्यांना दिले.

logo
marathi.freepressjournal.in