
हारून शेख/लासलगाव
एकीकडे धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील काही भागात भूजलाचा बेसुमार उपसा होत असल्यामुळे राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील ७७६ गावांमध्ये वैयक्तिक लाभासाठी विहीर खोदण्यास बंदी घातली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालातून ही बाब उघड झाली असून, या बंदीचा सर्वाधिक फटका निफाड व सिन्नर तालुक्यास बसला आहे.
नाशिक जिल्ह्यात १३८४ ग्रामपंचायती आणि १९२३ गावे आहेत. भूजल पातळी मोजताना मंडळाची किंवा तालुक्याची हद्द ग्राह्य न धरता पाणलोट क्षेत्राचा विचार केला जातो. गोदावरी, तापी पूर्व आणि पश्चिम वाहिनी नद्या या तीन खोऱ्यांमधील ८० पाणलोट क्षेत्रात नाशिक जिल्हा विभागला गेला आहे. गोदावरीत सर्वाधिक ३७ पाणलोट क्षेत्र आहेत. तापी पूर्वेला ३४ आणि पश्चिम वाहिनी नदी परिसरात नऊ क्षेत्र आहेत.
नाशिक जिल्ह्यातील ८० प्रमुख पाणलोट क्षेत्रापैकी बारा पाणलोट क्षेत्रात नैसर्गिक जल पुनर्भरणाच्या तुलनेत अधिक वेगाने पाणी उपसले जात आहे. या पाणी उपसण्याच्या निकषावर गावनिहाय मूल्यमापन करण्यात आले. ज्या पाणलोट क्षेत्रात पाणी उपशाचे प्रमाण ९०% पेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी नवीन विहिरी अथवा विंधन विहिरी खोदण्यास बंदी घालण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात अशा गावांची संख्या ३५७ असून ती १५ पाणलोट क्षेत्रात येतात. यामध्ये गोदावरी खोऱ्यातील नाशिक, निफाड, सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी या तालुक्यांचा समावेश आहे. पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पेठ तालुक्याला पाणीटंचाईचे ग्रहण सुरू झाले आहे. पेठ तालुक्यात सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण जास्त असले तरी पाणी अडविण्याच्या नियोजनाअभावी तालुक्यातील ३३ गावे आणि १० वाड्याचा संभाव्य टंचाई कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. पेठ तालुका हा उंच, डोंगराळ व खडकाळ असल्याने ग्रामीण भागातील विहिरी कधीही तळ गाठतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश भागातील पाण्याचे स्रोत आटल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे.
भूजल पातळी घटलेली गावे
सिन्नर ११८ गावे, निफाड १११, येवला १०९, बागलाण ९८, चांदवड ८६, कळवण ७२, देवळा ४१, दिंडोरी २८, इगतपुरी १३, मालेगाव ५४, नाशिक १८, नांदगाव २८ गावे.
धोक्याच्या पातळीवर ४१९ गावे
निफाड अतिसिंचित क्षेत्र असून सिन्नरचा निम्मा भाग कोरडवाहू आहे. बेसुमार उपशामुळे सिन्नरमधील ७७ गावांमध्ये विहिरींवर बंदी आहे. नाशिक जिल्ह्यातील १९४८ गावांपैकी ११७२ गावे सुरक्षित, तर ४१९ गावे धोक्याच्या पातळीवर आहेत. या गावांमध्येही वैयक्तिक लाभार्थींसाठी विहिरींना परवानगी नाही.