पावसाळी पर्यटनांना बंदी; वॉटर रिसॉर्टचालकांची चांदी; पर्यटकांकडून ऑनलाईन बुकिंगला अधिक जोर

पावसाळा सुरू होऊन मध्यावर आला की पर्यटकांचा ओढा हा धबधबे, धरण, ओढे व नद्यांकडे आपोआप वळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पावसाळी पर्यटनांना बंदी; वॉटर रिसॉर्टचालकांची चांदी; पर्यटकांकडून ऑनलाईन बुकिंगला अधिक जोर

ठाणे : पावसाळा सुरू होऊन मध्यावर आला की पर्यटकांचा ओढा हा धबधबे, धरण, ओढे व नद्यांकडे आपोआप वळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र भूशी डॅमच्या दुर्घटनेनंतर ठाणे आणि रायगडातील धबधबे, ओढे आणि नद्यांच्या निसर्गरम्य ठिकाणी जाण्यावर पर्यटकांना मज्जाव करण्यात आल्याने पर्यटकांनी आपला मोर्चा वॉटर रिसॉर्टकडे वळविला असून शनिवार आणि रविवार सर्वच वॉटर रिसॉर्टची बुकिंग फुल्ल झाल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे या वॉटर रिसॉर्ट‌्सनी आपले रेटही दुप्पट केले असले तरी जीवाची मजा करणाऱ्या पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग करत पावसाळी पिकनिकचे नियोजन सुरू केले आहे.

ठाणे, रायगड, पालघर हे जिल्हा पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत असतात. ठाणे जिल्ह्यातील संजय गांधी नॅशनल पार्क, येऊर, पाणखंडा, माळशेज, नाणेघाट, हरिश्चंद्रगड, शहापुरातील माहुली, आजोबा धबधबा, भातसा डॅम, तानसा अभयारण्य जांभे धरण, मुरबाडातील पाडाळे, बदलापुरातील भगीरथ, पालघरात दाभोसा, तिळसा, जव्हार तर रायगडातील कर्जत, पेण, सुधागड, महाड, श्रीवर्धनमधील पावसाळी पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा मोर्चा वळतो. मात्र यंदा भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर संपूर्ण कोकण पट्ट्यातील पर्यटन स्थळावर बंदी घालण्यात आल्याने पर्यटकांनी आपला मोर्चा वॉटर रिसॉट, रेनी रिसॉर्टकडे वळविला आहे. त्यामुळे बदलापूर, कर्जत, पेण, पनवेलमधील सर्व वॉटर व रेनी रिसॉर्ट हाऊसफुल्ल झाले आहेत. अनेक पर्यटक शनिवार-रविवारचा प्लॅन आखत आहेत. मात्र रिसॉर्टवाल्यांनी हीच संधी साधत आपले दरही दुप्पट केल्याची माहिती समोर आली आहे.

पावसाळा सुरू होऊन महिना उलटला मात्र अजूनही ठाणे, रायगडात मुबलक पाऊस झाला नसला तरी निसर्गतः वाहणारे धबधबे, ओढे यांचा आसरा घेण्यासाठी विकेंडला पर्यटक बाहेर पडले आहेत. पर्यटन स्थळाला भेट देतानाच प्रत्येकाने मजा करताना आपल्यासह इतरांची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. तरीदेखील ताम्हणी घाट आणि भूशी डॅमच्या घटनेनंतर पर्यटन स्थळांवर बंदी आल्याने पर्यटकांनी आपला मोर्चा वॉटर व रेनी रिसॉर्टकडे वळविला आहे.

पर्यटकांचीही रिसॉर्टला पसंती

ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये बारवी डॅम रोड, रायगडात कर्जतमध्येही सर्वाधिक रिसॉर्ट असून पावसाळ्यात हे रिसॉर्ट हाऊसफुल्ल असतात. वन डे पॅकेज, फॅमिली पॅकेज, व्हेज/नॉनव्हेज, क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम, फुटबॉल यासह विविध खेळांचा समावेश असलेल्या रिसॉर्टला पर्यटकांचीही पसंती लाभत आहे. फार्महाऊस असेल तर गार्डनिंग, मड डान्स, रेन डान्स, कराओके म्युझिक सिस्टमच्या तालावर एन्जॉय करण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध करून दिली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in