शाळेच्या आवारातील पानटपऱ्यांवर कारवाई करा; राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची मागणी

मुंबईसह राज्यातील शाळा लवकर सुरू होत आहेत. शाळेच्या परिसरातील १०० मीटर अंतरावर असणाऱ्या पानटपऱ्यांवर बंदी आहे. परंतु...
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : मुंबईसह राज्यातील शाळा लवकर सुरू होत आहेत. शाळेच्या परिसरातील १०० मीटर अंतरावर असणाऱ्या पानटपऱ्यांवर बंदी आहे. परंतु, राज्यात शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सर्रासपणे केली जाते. त्यामुळे शाळकरी मुले व्यसनांच्या आहारी जातात. ही बाब गंभीर असून, सरकारने शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील बंदीची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व पोलीस महानिरिक्षक दीपक कुमार पांडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबईत अनेक शाळा नागरी वस्तीच्या परिसरात आहेत. शिवाय बहुतांश ठिकाणी शाळा बाजार, दुकानांनी वेढलेल्या आहेत. या दुकानांमध्ये, स्टॉलमध्ये काही ठिकाणी तंबाखू, गुटखा, मावा, पान असे पदार्थ सर्रासपणे विकले जातात. विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होऊन ते व्यवसानाच्या आहारी जात आहेत. शाळकरी मुले तंबाखू, गुटख्याच्या आहारी जातात. विद्यार्थांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी ॲड. सुशीबेन शाह यांनी केली.

युवकांना तंबाखूच्या परिणामांची माहिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी शाळा व महाविद्यालयांचा परिसर तंबाखूमुक्त ठेवावा. १०० यार्डांच्या आत अशा पदार्थांची विक्री न करण्याविषयी कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित संस्थांची देखील आहे. - ॲड. सुशीबेन शाह, अध्यक्षा, राज्य बालहक्क संरक्षण आयोग.

logo
marathi.freepressjournal.in