
टुरिस्ट व्हिसावर भारतात आल्यानंतर मुंबई शहरात स्थायिक झालेल्या एका बांगलादेशी नागरिकाला शिवडी पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शोरीफुल कौसरअली इस्लाम असे या ३३ वर्षीय बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे. गेल्या चौदा वर्षांत त्याने मोहम्मद शरीफ कौसर शेख या नावाने भारतीय नागरिक असल्याचे बोगस पुरावे बनवून शासनाची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असून, याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
रविवारी शिवडी पोलीस ठाण्याचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. सायंकाळी साडेसहा वाजता शिवडीतील दारुखाना, चौथी गल्ली, टी के वेअरहाऊसजवळ येताच एक व्यक्ती पोलिसांना पाहून घाईघाईने जाताना दिसला. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव मोहम्मद शोरीफुल असल्याचे सांगितले. चौकशीदरम्यान तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडे पोलिसांना एक बांगलादेशचा पासपोर्ट, मोहम्मद शरीफ कौसर शेख नावाचे वाहन चालक परवाना, पॅनकार्ड,आधारकार्ड, बँकेचे डेबीट कार्ड सापडले. तपासात चौदा वर्षांपूर्वी तो टुरिस्ट व्हिसावर भारतात आला होता. त्यानंतर तो मुंबई शहरात कायमचा स्थायिक झाला होता.