भाऊराव साखर कारखान्याकडे बँकाचे २६५ कोटी रुपयांचे कर्ज

दोन कारखाने विकून आलेले पैसे गेले कुठे? इंगोले यांचा सवाल
भाऊराव साखर कारखान्याकडे बँकाचे २६५ कोटी रुपयांचे कर्ज

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडे बँकांचे २६५ कोटी रुपये कर्ज असल्याची बाब उघड झाली आहे. बँकेच्या कर्जाशिवाय कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या ऊस एफआरपीचे १०४ कोटी रुपये अद्याप देणे बाकी असल्याची माहिती उसदर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेना शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी देऊन हुतात्मा व शंकर वाघलवाडा हे कारखाने विकून आलेले पैसे कुठे गेले, असा सवाल उपस्थित केला.

आमच्याकडे बक्षीस ठेवायला जागा कमी पडत आहे, जिल्ह्यात आमच्याच साहेबांनी सहकार कसा जिवंत ठेवला? अशी शेखी मिरवणाऱ्यांना कारखान्याचे आर्थिक वास्तव कळल्याने पळताभुई होत आहे. कारखान्याचे भागभांडवल वाढवण्यासाठी शेअर्स धारकांना कर्ज द्यावे, त्यासाठी कारखाना हमी घेईल, अशा स्वरूपाची मागणी करताना सादर केलेल्या कारखान्याच्या आर्थिक विवरण पत्रात विविध बँकांचे कारखान्याकडे २६५ कोटी रुपये कर्ज असल्याची बाब समोर आली. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली.

कारखान्याच्या सभासदांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता ऊस एफआरपीचे थकीत पैसे कधी देणार? भाऊरावचे दोन युनिट विकून आलेली रक्कम कुठे गेली? याचा जाब कारखान्याच्या मुख्य प्रवर्तकासह चेअरमन व संचालक मंडळाला विचारून वेळप्रसंगी रस्त्यावर येण्याची तयारी ही शेतकऱ्यांनी ठेवावी, असे आवाहन प्रल्हाद इंगोले यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in