"जिथे राजा तीच राजधानी, जिथे साहेब तीच राष्ट्रवादी", मुंबई-पुण्यात शरद पवार गटाकडून बॅनरबाजी

"थकणारही नाही, झुकणारही नाही", "जित तो आजभी हमारी हुई है| चिन्ह तुम्हारा बाप हमारा" असा मजकूर असलेले अनेक बॅनर लावून शरद पवार यांना...
"जिथे राजा तीच राजधानी, जिथे साहेब तीच राष्ट्रवादी", मुंबई-पुण्यात शरद पवार गटाकडून बॅनरबाजी

केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गट हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल देत चिन्हही अजित पवार गटाला दिले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रसेच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर बॅनर लावले असून हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत. शरद पवार यांना पाठिंबा देणारी ही बॅनर्स आहेत. "जिथे राजा तीच राजधानी, जिथे साहेब तीच राष्ट्रवादी. मी माझ्या बापासोबत", अशा आशयाची ही बॅनर्स आहेत.

"थकणारही नाही, झुकणारही नाही", "जित तो आजभी हमारी हुई है| चिन्ह तुम्हारा, बाप हमारा", असा मजकूर असलेले अनेक बॅनर लावून शरद पवार यांना समर्थन दर्शवण्यात आले आहे. एकीकडे निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर राष्ट्रवादीचे मुंबईतील मुख्यालय अजित पवार गट आपल्या ताब्यात घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना याच कार्यालयाबाहेर ही बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

पुण्यातही झळकले शरद पवारांच्या समर्थनार्थ बॅनर-

पुण्याच्या कोथरुड परिसरातही शरद पवारांच्या समर्थनात बॅनर्स झळकले आहेत. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोथरूड अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी ठीक ठिकाणी बॅनर्स लावले आहेत. यावर, ‘फिर हेरा फेरी’, "हुकूमशाही पद्धतीने पक्ष आणि चिन्ह मिळवाल….पण लोकांच्या मनात घर कसे कराल..जोर जबरदस्तीने अन्याय करू शकता, लोकांचे प्रेम मिळू शकत नाही”, असे म्हणत "उठ मित्रा जागा हो, या अन्यायाच्या विरोधातल्या लढाईचा धागा हो", "एक सूर्य, एक चंद्र आणि एकच शरदचंद्र..", असा मजकूर लिहिला आहे.

दरम्यान, आयोगाने शरद पवार गटाला आज(७ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजेपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह सुचवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज शरद पवार गटाकडून पक्षाचे नाव आणि चिन्ह सादर केले जाण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाने पक्षासाठी 'मी राष्ट्रवादी पार्टी' हे नाव आणि 'उगवता सूर्य' हे चिन्ह निवडले असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच, शरद पवार गट निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in