बाप्पाच्या उत्सवाला जीएसटीचा फटका; पूजा साहित्यांवरही ‘जीएसटी’ लागणार

दुकानदारांकडून बाप्पासाठी काही विकत घेतले किंवा त्याच्या मुक्कामासाठी म्हणून मंडप वगैरे घातला, तर त्यावर मात्र मंडळांना ‘जीएसटी’ द्यावा लागेल
 बाप्पाच्या उत्सवाला जीएसटीचा फटका; पूजा साहित्यांवरही ‘जीएसटी’ लागणार

गणेशोत्सवाला अवघा एक महिना शिल्लक असताना भाविकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांच्या खिशाला ‘जीएसटी’ची कात्री लागणार आहे. थेट गणेशमूर्तीवर ‘जीएसटी’ नसला तरी त्याच्यासाठी लागणाऱ्या मांडव, विद्युत रोषणाई तसेच पूजा साहित्यांवरही ‘जीएसटी’ लागणार आहे. थोडक्यात बाप्पाची ‘जीएसटी’मधून सुटका झाली, तरी बाप्पाच्या उत्सवाला त्याचा फटका बसणार आहे.

खाद्यपदार्थांवर जीएसटी लागू झाल्याने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. बंद पाकिटात कोणतेही ब्रँडेड पदार्थ घेतले तर त्यावर आता जीएसटी द्यावा लागत आहे. गणेशोत्सवालाही केंद्र सरकारच्या या कराचा मोठा फटका बसणार आहे. बाप्पाच्या मूर्तीवर ‘जीएसटी’ लागणार नाही; पण दुकानदारांकडून बाप्पासाठी काही विकत घेतले किंवा त्याच्या मुक्कामासाठी म्हणून मंडप वगैरे घातला, तर त्यावर मात्र मंडळांना ‘जीएसटी’ द्यावा लागेल. याचा फटका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बसणार आहे. उत्सवासाठी मंडप टाकला जातो. त्याची पावती घेतली जाते. मंडप व्यावसायिक ही पावती देताना मंडळाकडून ‘जीएसटी’ घेणार आहे. कारण पावतीचा व्यवहार आल्यामुळे त्याला ग्राहकांकडून कर द्यावा लागणार आहे. हा कर दुकानदार थेट सरकारजमा करेल. त्याचा त्याला काहीच फायदा होणार नाही; मात्र मंडळाला पावती हवी असेल, तर हा कर द्यावाच लागणार आहे. सार्वजनिक मंडळांना त्याचा हिशेबाचा ताळेबंद धर्मादाय आयुक्तांना सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांना पावती घ्यावीच लागणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in