निवडणुका आल्या की आमच्यावर आरोप होतात! जमीन घोटाळ्यावरून अजित पवारांचे विरोधकांना प्रत्युत्तर; सत्य लवकरच बाहेर येईल!

निवडणुका सुरू झाल्या की आमच्यावर आरोप होतात. याआधी देखील माझ्यावर असेच आरोप झाले. पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. मात्र बदनामी झाली. आताही पुन्हा घोटाळ्याचे आरोप करण्यात आले असले तरी सत्य लवकरच बाहेर येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
अजित पवार | संग्रहित छायाचित्र
अजित पवार | संग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : निवडणुका सुरू झाल्या की आमच्यावर आरोप होतात. याआधी देखील माझ्यावर असेच आरोप झाले. पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. मात्र बदनामी झाली. आताही पुन्हा घोटाळ्याचे आरोप करण्यात आले असले तरी सत्य लवकरच बाहेर येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून विरोधकांनी पार्थ पवार व अजित पवार यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. यावरून बचावात्मक पवित्रा घेतलेल्या अजितदादांनी रविवारी आक्रमक होत विरोधकांचा समाचार घेतला.

मुंढवा आणि बोपोडी येथील कथित शासकीय जमीन खरेदी प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या जमिनीचा व्यवहार अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने केला असून, १८०० कोटींची जमीन ३०० कोटींत खरेदी केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल झाला असला, तरी पार्थ पवारांवर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे विरोधकांनी अजित पवारांना लक्ष्य केले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी चांगले अधिकारी चौकशी समितीत घेतले आहेत, त्यामुळे महिन्याभरात वस्तूस्थिती समोर येईल. निवडणुका सुरू झाल्या की आमच्यावर आरोप सुरु होतात. कुठूनतरी, काहीतरी असे काहीतरी बाहेर आणले जाते. यावेळी त्यांनी २००८-०९ मधील ७० हजार कोटींच्या आरोपांची आठवण करून दिली. तुम्हाला आठवत असेल, त्यावेळी माझ्याविरोधात ७० हजार कोटींचा आरोप झाला. त्याला १५-१६ वर्षे लोटली. त्यातून कुणीही काहीही पुरावे देऊ शकले नाही. पण आमची बदनामी झाली, असे अजित पवार म्हणाले.

माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाल्यापासून मी कुठलीही चुकीची गोष्ट होऊ देत नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. ‘मुंबईतही सांगितले, पुण्यातही आणि आता इथे ही सांगतो की माझ्या नावाचा वापर करून, मग माझे जवळचे नातेवाईक, कार्यकर्ते, अधिकारी असतील, त्यांनी जरी यदाकदाचित काही सांगितले, ते जर नियमाला धरून नसेल, तर संबंधित अधिकाऱ्याने ते काम करता कामा नये, असा सूचक दम अजितदादांनी यावेळी आपल्या जवळच्या लोकांना दिला. क्लास वन, टू आणि सर्व अधिकारी, आयएएस,आयपीएस अधिकाऱ्यांनी नियमात न बसणारे काम न करण्याचे आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले.

१ रुपयाचा व्यवहार न करता कसा कागद तयार होऊ शकतो?

मुंढवा प्रकरणातील कथित कागदपत्रांवर आश्चर्य व्यक्त करताना अजित पवार म्हणाले, १ रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा काय कागद तयार होऊ शकतो? हे आजपर्यंत मला कळलेले नाही. मी पण आश्चर्यचकित झालो. या प्रकरणातील नोंदणी प्रक्रियेवर त्यांनी थेट बोट ठेवत प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केला. ज्या रजिस्टर ऑफिसच्या व्यक्तीने ही नोंदणी केली, त्याने अशी नोंदणी कशामुळे केली? काय असे घडले की त्याने चुकीचे काम केले? असा सवाल त्यांनी केला. याविषयीची वस्तुस्थिती एका महिन्यात कळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in