...तर बारामतीला वेगळा आमदार मिळावा! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याने खळबळ

बारामती मतदारसंघात विकासकामे करूनही बारामतीकर वेगळा निर्णय घेणार असतील, तर बारामतीला वेगळा आमदार मिळाला पाहिजे, असे धक्कादायक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
...तर बारामतीला वेगळा आमदार मिळावा! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याने खळबळ
संग्रहित फोटो
Published on

बारामती : बारामती मतदारसंघात विकासकामे करूनही बारामतीकर वेगळा निर्णय घेणार असतील, तर बारामतीला वेगळा आमदार मिळाला पाहिजे, असे धक्कादायक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. माझ्या कार्यकाळाची आणि नव्या व्यक्तीच्या कामाची तुलना व्हावी, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या मेळाव्याला संबोधित करताना लोकसभेत झालेल्या पराभवावर भाष्य केले.

ते म्हणाले की, पक्ष हा कायम कार्यकर्त्यांच्या बळावर चालतो. कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो. त्या कण्याने काम न केल्यास गडबड होते. कोणतीही निवडणूक असो किंवा बैठक असो, कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडणूक आणि यश अवलंबून असते. माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासून ते आता उपमुख्यमंत्रीपदापर्यंत अनेक मोठ्या जबाबदाऱ्या मला कार्यकर्त्यांमुळे मिळाल्या.

मीही शेवटी माणूस आहे, माझ्या मनात पण विचार येतो की, एवढी सगळी कामे करूनही बारामतीकर वेगळा निर्णय घेऊ शकतात. आपण तर दुसऱ्यांना खासदार करू शकतो. नितीन पाटलांना, प्रफुल्ल पटेलांना खासदार केले. राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जेला आमदार केलेले तुम्ही पाहिले आहे. पण, ऐनवेळी गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची चांगली, असे ते म्हणाले.

आपण लाखाने निवडून येणारी माणसं, मी पण आता ६५ वर्षांचा झालो. पण आपण समाधानी आहोत. जिथं पिकतं तिथं विकत नसतं, बारामतीकरांना कोणीतरी मी सोडून वेगळा आमदार मिळाला पाहिजे, मग तुम्ही माझी १९९१ ते २०२४ या माझ्या कारकीर्दीची तुलना करा आणि त्या माणसाचे काम बघा, असे अजित पवार यांनी सुनावले.

न सांगताच सर्व कामे होतात !

बारामती शहरात न सांगता रस्ता होतो, न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होतात. आता किती कोटींच्या योजनांची कामे सु‌रू आहेत. बारामती शहर सोडून साडेसातशे कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. यापूर्वी बारामती तालुक्यातील रस्ते कसे होते? आता कसे आहेत, काही खराब आहेत ते कसे करायचे ते पाहू. न मागता मेडिकल कॉलेज मिळतं, तुम्ही सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे त्याचे नामांतर करा, तेही केले, असे पवार म्हणाले. सकाळपासून भल्या पहाटे उठून काम करतो. काहीजण आमची चेष्टा करतात, त्याच्याबद्दल काही म्हणणे नाही. जे आहे ते आहे. ही बारामतीच्या भवितव्याची निवडणूक आहे, सत्तेत असू तर अर्थकारणाला गती मिळणार आहे, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in