बारसूमध्ये पुन्हा एकदा पोलीस विरुद्ध आंदोलक; एकीकडे सर्वेक्षण तर दुसरीकडे आंदोलक आक्रमक
बारसू येथे पुन्हा एकदा पोलीस विरुद्ध आंदोलक असे चित्र पाहायला मिळाले. आज दुपारी बारसूच्या माळरानावर सर्वेक्षण सुरु असताना ते थांबवण्यासाठी काही आंदोलक त्याठिकाणी दाखल झाले. हजारो आलेल्या या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र, भर उन्हामध्येही आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी काम बंद करण्यासाठी त्यांनी गोंधळ सुरु केला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बघता त्यांनी आंदोलकांना तिथून हटवण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी अश्रुधुरांचा वापर केला. पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यात तर यश आले. पण, भर उन्हामध्ये माळरानावर होत असलेल्या या आंदोलनामुळे अनेक आंदोलकांना त्रास होऊ लागला. अनेक गावकरी आंदोलक उष्णतेमुळे तिथेच जागेवर बसले. यावेळी अनेकांना चक्करदेखील आल्याचे समोर आले. तसेच, काही आंदोलकांनी, पोलिसांनी लाठीमार केल्याचादेखील आरोप केला. त्यामुळे हे आंदोलन आता चांगलेच चिघळले असून बारसूमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून शेतकऱ्यांशी कधीही चर्चा करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.