"जीव गेला तरी..." बारसू रिफायनरीवरून ग्रामस्थांचे तीव्र आंदोलन

बारसू येथील रिफायनरीच्या सर्वेक्षणावरून स्थानिक ग्रामस्थांनी कालपासून आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर आज त्यांनी पोलिसांचा रस्ता अडवला होता
"जीव गेला तरी..." बारसू रिफायनरीवरून ग्रामस्थांचे तीव्र आंदोलन

कालपासून कोकणातील रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलन सुरु आहे. आज काही महिला आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या. यानंतर या आंदोलनाला तीव्र स्वरूप प्राप्त झाले. यावेळी हे सर्वेक्षण बंद झाले पाहिजे, अशी मागणी या आंदोलनकांनी केली. यावेळी पोलिसांनी या आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी २५ आंदोलनकर्त्या महिलांना पोलिसांनी अटकदेखील केली असून सौम्य लाठीचार्जही केल्याचे सांगण्यात आले आहे. या आंदोलनाचे आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईचे पडसाद हे राज्यभरात उमटू लागले असून विरोधी पक्षातील नेत्यांनी याविरोधात राज्य सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, एका महिलेने, 'माझा जीव गेला तरीही मी या जागेवरून हलणार नाही,' असा इशारा दिला. तसेच, काही आंदोलकर्त्या महिलांनी, 'कोकणातील राजकारणी लोकांनी आणि नेत्यांनी आमचा विश्वाघात केला असून आम्हाला फसवले,' अशा प्रतिक्रिया दिल्या. या आंदोलनावरून २५ आंदोलक महिलांना अटक करण्यात आली. तसेच, पोलिसांनी आंदोलकांना आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनासुद्धा आंदोलनस्थळावरून हटण्याचे निर्देश दिले आहेत. या परिसरात राज्य सरकारने कलम १४४ लागू केले असून वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, या आंदोलनामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडून फोनवरून परिस्थितीचा आढावा घेतल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, "असे आंदोलन करणे हा चुकीचा पर्याय आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी सरकार घेत आहे. तेथील लोकांशी याबाबत नक्कीच संवाद साधण्यात येईल." अशी माहिती त्यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in