‘फेक नरेटिव्ह’विरुद्ध हवी तशी बॅटिंग करा, फक्त हिट विकेट होऊ नका! -देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मैदानात उतरा आणि हवी तशी बॅटिंग करा. फक्त हिट विकेट व्हायचे नाही, सेल्फ गोल करायचा नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना प्रचारासाठी मैदानात उतरण्याचे आवाहन केले.
‘फेक नरेटिव्ह’विरुद्ध हवी तशी बॅटिंग करा, फक्त हिट विकेट होऊ नका! -देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
संग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : ‘फेक नरेटिव्ह’ हा आजच्या काळातला रावण आहे. या रावणाच्या बेंबीत बाण मारायचा आहे. त्यामुळे ‘फेक नरेटिव्ह’ला थेट ‘नरेटिव्ह’ने उत्तर देण्याची इकोसिस्टिम आपण तयार करतो आहोत. त्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे. खोट्याला खऱ्याने उत्तर द्यायचे आहे. त्यासाठी आता आदेशाची वाट पाहू नका. मैदानात उतरा आणि हवी तशी बॅटिंग करा. फक्त हिट विकेट व्हायचे नाही, सेल्फ गोल करायचा नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना प्रचारासाठी मैदानात उतरण्याचे आवाहन केले. दरम्यान, मुख्यमंत्री कोण हा प्रश्न आता विचारू नका. मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फडणवीस म्हणाले, जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे, सेल्फगोल करायचा नाही. मात्र, काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलण्याऐवजी आपल्यावरच बोलून जातात. ते असे काही बोलतात की त्याची उत्तरे पुढील चार दिवस द्यावी लागतात. त्यामुळे विरोधकांना उत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा, असा आदेश त्यांनी दिला. फडणवीस म्हणाले की, आज हिंदूंना, शिवप्रेमींना दहशतवादी म्हटले जाते. आज जागे झालो नाही, तर जागे होण्याची संधीही मिळणार नाही. आपल्या हिंदुत्वाबद्दल अपराधबोध ठेवण्याची गरज नाही. फेक नरेटिव्ह हा आजचा रावण आहे, त्याच्या बेंबीत बाण मारायचा आहे. केवळ दोन लाख मतांचा फरक आहे, पण ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर केली तेव्हाच दोन लाख मते वाढली आहेत.

मुख्यमंत्री महायुतीचाच होणार

अलीकडे काम करणाऱ्यांपेक्षा सल्ले देणारे वाढले आहेत. नेत्यांकडून काही चुका झाल्या असतील तर कार्यकर्त्यांनी पोटात घ्याव्यात. नकारात्मक बोलून निष्ठेने काम करणाऱ्यांच्या मनात विष कालवू नका. कमी जागा मिळाल्यावरही कोण बरोबर राहतो हे महत्त्वाचे आहे. पावणेदोन कोटी मते घेतल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री कोण हा प्रश्न आता विचारू नका. मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आहे. महायुतीचे सरकार आणणे एवढेच लक्ष्य आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आरक्षणाबाबत ‘मविआ’ची भूमिका दुटप्पी

मराठा समाजाला ‘ओबीसी’मध्ये आरक्षण देण्याकरिता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचे समर्थन आहे का? हे एकदा स्पष्ट करा, असे थेट आव्हान देत तुमची ही दुटप्पी भूमिका आता सोडा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. दरम्यान, पवारसाहेब चार वेळा स्वतः मुख्यमंत्री होते. त्यांनी मराठा आरक्षण का दिले नाही? असा सवालही त्यांनी केला. पुण्यातील बालेवाडी येथे भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मनोज जरांगे यांना माझा सवालच नाहीय. माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे. जरांगे-पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे, त्याबाबत तुमची भूमिका स्पष्ट करा.

तुम्ही सांगा की मराठा समाजाला ‘ओबीसी’मध्ये आरक्षण देण्याकरिता तुमचे समर्थन आहे का? एकदा हे स्पष्ट करा. महाविकास आघाडीचे हे तिन्ही नेते आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका घेत आहेत. मराठा आणि ओबीसी समाजाला झुलवत ठेवण्याचे काम महाविकास आघाडीकडून सुरू आहे. महाविकास आघाडीचा हा बुरखा फाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही”, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज राज्यामध्ये एक विचित्र अशा प्रकारची स्थिती आहे. अशी स्थिती आपण राज्यात कधीच बघितली नव्हती. आज अनेक समाज एकमेकांसमोर उभे आहेत. दुर्दैवाने या राज्यातील काही नेत्यांना असे वाटते की, हे समाज एकमेकांसमोर उभे ठाकले तरच आपण निवडून येऊ शकतो, म्हणून त्याच्यामध्ये पेट्रोल ओतण्याचे काम काही राज्यकर्ते करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

मराठ्यांना आरक्षण मिळावे ही भाजपची भूमिका

निवडणुका येतील आणि जातील. एखादे सरकार बनेल, एखादे राहणार नाही. सरकार येतात आणि जातात. पण, समाज एकसंघ राहिला पाहिजे. एखाद्या निवडणुकीत तुमची पोळी भाजली जाईल, पण एकदा समाजामध्ये दुफळी राहिली तर किमान तीन पिढ्यांत दुफळी तुम्हाला दूर करता येत नाही. आम्ही आमच्या समाजाला कुठे नेतो आहोत? आम्ही नेमके काय करतो आहोत? याचादेखील विचार झाला पाहिजे. भारतीय जनता पक्षाने नेहमी स्पष्ट भूमिका ठेवली आहे. मराठा समाजामधील जो गरीब मराठा आहे त्याला आरक्षण मिळाले पाहिजे, ही पहिल्या दिवशीपासून भाजपची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आरक्षणाचा पहिला बळी अण्णासाहेब पाटील

फडणवीस यांनी आरक्षणाची लढाई सुरू कधी झाली? असा सवाल करीत १९८२ साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितले की, तुम्ही आरक्षण दिले नाही तर माझा जीव मी संपवेन. त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले, नाही देत आणि स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी स्वतःला गोळी मारून घेतली. मराठा आरक्षणाचा पहिला बळी जर कोणी होते तर ते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील होते, असे ते म्हणाले.

आम्ही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले

होय आम्ही आरक्षण दिले, आमचे सरकार होते तोपर्यंत सुप्रीम कोर्टात तीन वेळा केस लागली. सुप्रीम कोर्टाने नकार दिला जोपर्यंत आम्ही होतो. सुप्रीम कोर्टामध्येदेखील आम्ही आरक्षण टिकवून दाखवले. पण दुर्दैवाने महाविकास आघाडीत ठाकरे आणि शरद पवार यांचे सरकार आले आणि मराठा आरक्षण गेले. त्याला प्रोटेक्ट करण्याकरिता कुठलाही प्रयत्न केला गेला नाही. पुन्हा एकनाथराव शिंदे यांचे सरकार आले. आम्ही पुन्हा मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले. आज भरती चाललेली आहे. पोलीस भरतीमध्ये हजारो तरुण आता मराठा समाजाचे भरती झाले आहेत. हजारो तरुणांची वेगवेगळ्या खात्यांमध्ये भरती झालेली आहे.

logo
marathi.freepressjournal.in