Beed : अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक; चौघे गंभीर जखमी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
Beed : अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक; चौघे गंभीर जखमी
Beed : अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक; चौघे गंभीर जखमी
Published on

बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. परभणीहून धारूरमार्गे पुढे जात असताना तेलगाव-धारूर रस्त्यावर धुनकवड फाट्याजवळ अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नी आणि त्यांच्या दोन लहान मुली जखमी झाल्या असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील

रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे तेलगावहून केजकडे जात असताना शनिवारी दुपारी त्यांच्या ताफ्यातील कारचालकाच्या निष्काळजीपणामुळे त्यांनी भोगलवाडी येथील विष्णू सुदे यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात विष्णू सुदे, त्यांची पत्नी कुसुम सुदे, आणि त्यांच्या दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना धारूर ग्रामीण रुग्णालयात हलवले. त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या धडकेत अजित पवारांच्या ताफ्यातील एक सुरक्षारक्षकही जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच धारूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आणि पंचनामा सुरू केला. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार ताफ्यासह सुरक्षित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज मिळताच अपघाताचा नेमका क्रम स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे तेलगाव-धारूर रस्त्यावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. ताफ्यातील गाड्यांच्या वेगामुळे आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in