
बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, वाल्मिक कराडकडून अवादा कंपनीकडे मागण्यात आलेली २ कोटींची खंडणी, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मकोका) या तिन्ही प्रकरणातील सुमारे १४०० पानांचे दोषारोपपत्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून विशेष ‘मकोका’ न्यायालयात गुरुवारी दाखल करण्यात आले.
यावेळी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बसवराज तेली आणि एसआयटीचे प्रमुख किरण पाटील न्यायालयात उपस्थित होते. आता सरपंच हत्येचा खटला कोर्टात चालणार असून, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे हा खटला लढवणार आहेत.
काय आहे आरोपपत्रात?
वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला सहभाग
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सात आरोपींनी कशाप्रकारे हत्येचा कट रचला आणि हत्या केली याचे पुरावे.
या हत्याकांडामध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे याचा तपास.
खंडणी प्रकरण त्यानंतर ॲट्रॉसिटी प्रकरण आणि त्यानंतर हत्या प्रकरण या तिन्ही प्रकरणाचा एकमेकांशी काही संबंध आहे का याचे पुरावे.
या प्रकरणातील आरोपींना फरार होण्यात कोणी सहकार्य केले, आरोपी फरार झाल्यानंतर कुठे होते? काय केले? यासंदर्भातीलही सत्य दोषारोपपत्रातून समोर येणार.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी वापरलेले शस्त्र आणि हत्या नेमकी कशा पद्धतीने झाली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली का आणि कुणी दोषी आहेत का? याबाबतचे तथ्य.
या प्रकरणाशी संबंधित असलेल्या कुणाकुणाची चौकशी झाली.