मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पवारांची खेळी! पंकजा मुंडेंविरुद्ध ज्योती मेटे मैदानात?

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासाठी बीड लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचा मानला जातो. या मतदारसंघात नेहमी माजी मंत्री पंकजा मुंडे आणि विद्यमान मंत्री धनंजय मुंडे यांच्यात लढत राहिलेली आहे. मात्र, यावेळी दोघे बहीण-भाऊ...
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पवारांची खेळी! पंकजा मुंडेंविरुद्ध ज्योती मेटे मैदानात?

विशेष प्रतिनिधी/मुंबई

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासाठी बीड लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचा मानला जातो. या मतदारसंघात नेहमी माजी मंत्री पंकजा मुंडे आणि विद्यमान मंत्री धनंजय मुंडे यांच्यात लढत राहिलेली आहे. मात्र, यावेळी दोघे बहीण-भाऊ एकत्र आले आहेत आणि आता भाजपने थेट पंकजा मुंडे यांनाच लोकसभेची उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांच्याविरोधात शरद पवार काय डाव खेळणार, अशी चर्चा सुरू आहे. त्यातच आता माजी आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मेटे यांना मैदानात उतरवून पंकजा मुंडे यांच्यासमोर आव्हान उभे करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. परंतु अद्याप त्याची घोषणा झालेली नाही. परंतु महाविकास आघाडीत बीडची जागा शरद पवार गटालाच मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असावा, याचे गणित शरद पवार घालत आहेत. बीडमध्ये मुंडे बहीण-भाऊ एकत्र आल्याने आता शरद पवार गटासमोर मोठे आव्हान उभे आहे. अशावेळी पंकजा मुंडे यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत उत्सुकता आहे.

मराठा आरक्षणासाठी सातत्याने लढा दिलेले शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांच्या ज्योती मेटे पत्नी आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी बीडमध्ये मागच्या काही दिवसांत तीव्र आंदोलने झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार मराठा आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी सांगड घालण्याच्या दृष्टीने ज्योती मेटे यांना मैदानात उतरविण्याचा विचार करीत आहेत. याचा त्यांना कितपत फायदा होईल, हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.

या अगोदर पंकजा मुंडे यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात दोनवेळा बजरंग सोनवणे यांनी लढत दिली आहे. दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी या अगोदर शरद पवार यांची भेट घेऊन निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते. आता त्या थेट बुधवारी शरद पवार गटात सामील होणार आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्याविरोधात त्यांना उमेदवारी मिळू शकते.

महिलेविरुद्ध महिलाच?

बीड लोकसभा मतदारसंघात नेहमीच मराठा विरुद्ध वंजारी असेच चित्र निर्माण होते. त्यामुळे शरद पवार यांनी सातत्याने मराठा उमेदवार मैदानात उतरवता येईल, याचीच काळजी घेतली आहे. यावेळीही तसेच चित्र आहे. त्यात मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून मैदानात असलेले बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटाकडून मैदानात उतरण्यासाठी प्रयत्न केले. परंतु महिलाविरुद्ध महिला अशी लढत होण्याच्या दृष्टीने शरद पवार बीडमधून एका महिलेलाच मैदानात उतरवू शकतात. त्यादृष्टीने एक मराठा महिला म्हणून ज्योती मेटे यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in