
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच गुरुवारी रात्री आष्टी तालुक्यातील वाहिरा गावात जमावाने दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या केल्याने जिल्हा पुन्हा हादरला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवरून विरोधकांनी रान उठवले. त्यामुळे राज्यभराचे लक्ष बीड जिल्ह्याकडे लागले. या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी सर्वच क्षेत्रातून दबाव वाढला. मात्र, तरीही बीडमधील गुन्हे थांबण्याचे चित्र दिसत नाही.
संतोष देशमुख प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पहिल्या दिवसापासून आक्रमक भूमिका घेतली आहे. आता सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातच दुहेरी हत्येची घटना घडली आहे. आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्री काही लोकांनी लोखंडी रॉड, धारदार शस्त्राने तीन भावांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा गंभीर जखमी आहे. याप्रकरणी अंभोरा पोलीस अधिक तपास करत आहेत.
हल्ल्याचे कारण अस्पष्ट
जमावाच्या हल्ल्यात अजय भोसले आणि भरत भोसले या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असून कृष्णा भोसले हा गंभीर जखमी आहे. हे तिघेही भाऊ गावात चर्चा करीत असताना गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले. यातील काही लोकांनी या तीनही भावांवर हल्ला चढवला. मारहाण आणि खून नेमका कोणत्या कारणाने झाला, हे मात्र अद्याप समजले नसून आष्टी ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू आहे.
अंभोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी, स्थानिक प्रशासन आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
आठ संशयित ताब्यात
पोलिसांनी आठ संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. वाहिरा गावात आदिवासी समाजातील नातेवाईकांच्या जुन्या वादातून ही घटना घडली आहे. दरम्यान, ज्यांची हत्या करण्यात आली आणि ज्यांनी हत्या केली त्या सर्वांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पोलिसांनी गुन्हेगारांचा तपास करण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
केजमध्ये सापडला अवादा कंपनीच्या कामगाराचा मृतदेह
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील ‘अवादा एनर्जी’ या पवन ऊर्जा कंपनीतील एका मजुराचा केजमधील रस्त्यावर मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या कामगाराचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कामगाराचे नाव रचपाल हमीद मसीह असे असून तो पंजाबच्या गुरुदासपूरचा रहिवासी आहे. तो मस्साजोग येथील ‘अवादा एनर्जी’ या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. केज-अंबाजोगाई मार्गावरील चांदणी बारसमोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडल्याचे आढळून आले. केज पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ताब्यात घेतला आहे.
अंबाजोगाईत हवेत गोळीबार
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत हवेत गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जमिनीच्या वादातून मोरेवाडी परिसरात हवेत गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गोळीबार करण्याचा उद्देश नेमका काय होता, याचा तपास करण्यासाठी पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.