
मुंबई : भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचा उल्लेख केला होता. यावरून संतप्त झालेली अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सुरेश धस यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. राजकारणात कलाकारांना का खेचता? असा सवालही तिने केला आहे.
मुंबईत शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळी बोलत होती. या प्रकरणावर शांत राहा, असे मला सर्वांनी सांगितले. या सर्व आवया येतात आणि निघून जातात. चिखलफेक होऊ नये, म्हणून मी इतके दिवस शांत बसले. परंतु, लोकप्रतिनिधी आपल्यावर चिखलफेक करतात, त्यावेळी बोलणे गरजेचे आहे, असे ती म्हणाली.
एका सांस्कृतिक कार्यक्रमात सत्कार स्वीकारताना काढलेला एक फोटो, ती आमची एकमेव भेट आणि धन्यवाद या एकमेव शब्दावरून एवढी आरोळी का उठवावी? असा सवाल प्राजक्ता माळीने केला. माझ्यावर माझ्या सोबतच्या लोकांचा विश्वास होता. ती माझी जमेची बाजू होती. त्यामुळे मला माझ्या चारित्र्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी समोर येण्याची गरज वाटली नाही. आज एक लोकप्रतिनिधी टिप्पणी करतात. त्यामुळे ही वेळ आली आहे, अशी खंत प्राजक्ता माळीने व्यक्त केली.
राजकारणात कलाकारांना का खेचता ?
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे. तुम्ही राजकारणी आहात, आम्ही कलाकार आहोत. तुम्ही तुमचे राजकारण करा, पण आम्हा कलाकारांना मध्ये का खेचता? परळीला केवळ महिला कलाकारच येतात का, पुरुष कलाकार कधी गेलेच नाहीत का? महाराष्ट्रातील राजकारण्यांना हे शोभत नाही, तुम्ही महिला कलाकारांच्या चारित्र्यावर संशय घेत नाहीत, तर त्यांच्या कर्तृत्वावर देखील प्रश्न उपस्थित करता. असे म्हणत प्राजक्ता माळीने आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली. कुठल्याही राजकारण्यांच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का? अशी टिप्पणी करून तुम्ही स्वतःची मानसिकता दाखवत आहात. ही खेदजनक बाब आहे, असेही प्राजक्ता माळीने यावेळी नमूद केले.
महिला आयोगाकडे केली तक्रार
तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी महिला कलाकारांची नावं घेणे बंद करा. हे महाराष्ट्रातील राजकारण्यांना शोभत नाही. सुरेश धस यांनी विनम्रपणे माझी माफी मागावी. मी आज महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी योग्य ती कारवाई करावी. मीदेखील कायदेशीर कारवाई करत राहीन. माझ्या कुटुंबावरही याचा अत्यंत वाईट परिणाम होतोय. या सगळ्याला तोंड देणे हे अजिबात सोपे नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी विनंती करते की, त्यांनी याबाबत ठोस कारवाई करावी, असे प्राजक्ता माळी म्हणाली.
... तर कायदेशीर मार्गाने कारवाई करेन
बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना तुमची गाडी कलाकारांवर का घसरते? हे सगळे कितपत योग्य आहे, तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ. त्यांनी माफी मागितली नाही, तर कायदेशीर मार्गाने माझ्या वकिलांमार्फत कारवाई करेन, असा इशाराही प्राजक्ता माळीने धस यांना दिला.
मी माफी मागणार नाही - सुरेश धस
“मी प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही, माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे. तसेच निषेध म्हणून मी महाराष्ट्राची हास्यजत्रा बघायचे बंद करतो. या खून प्रकरणावरचे लक्ष प्रसारमाध्यमांनी कोणत्याही हिरो- हिरोईनकडे ढकलू नये. मी प्राजक्ता माळी यांच्याबाबत कोणतेही आक्षेपार्ह बोललेलो नाही.” असे भाजप आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केले.
सुरेश धस काय म्हणाले होते?
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख केला होता. 'अभिनेत्री प्राजक्ताताई माळी आमच्याकडे येतात. आम्ही परळीत त्यांना बघत असतो, रश्मिका मंधाना, सपना चौधरी येत असतात. ज्यांना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचे शिक्षण घ्यायचे असेल त्यांनी परळीत यावे. प्राजक्ता माळीही आमच्याकडे येत असतात. त्यांचा अतिशय जवळचा पत्ता सापडायचा असेल, तर आमचा परळी पॅटर्न बघितला पाहिजे', असे सुरेश धस यांनी म्हटले होते.