बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी तसेच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मूक मोर्चात जनतेचा आक्रोश पाहायला मिळाला.
शनिवारी सकाळी ११ वाजता निघालेला हा सर्वपक्षीय मोर्चा बीडच्या डॉ. आंबेडकर चौकातून माळीवेस, अण्णाभाऊ साठे चौक, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचला. या मोर्चात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड तसेच आमदार संदीप क्षीरसागर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाशदादा सोळंके, भाजप आमदार सुरेश धस, भाजप आमदार अभिमन्यू पवार, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील, माजी आमदार बच्चू कडू अशी सर्वपक्षीय नेतेमंडळी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. त्यानंतर झालेल्या सभेत सर्वच नेत्यांनी आरोपी वाल्मिक कराड याला अटक करण्याची तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी एकसुरात केली.
या मोर्चात मृत संतोष देशमुख यांची दोन्ही मुले, पत्नी तसेच बंधू धनंजय देशमुख हेसुद्धा सहभागी झाले होते. यावेळी त्यांची मोठी मुलगी वैभवी देशमुख म्हणाली की, "सर्वांनी एक होत माझ्या बाबांना न्याय मिळवून द्यावा. माझ्या वडिलांना कोणताही गुन्हा नसताना हाल हाल करून मारण्यात आले. त्यांनी शेवटपर्यंत समाजसेवा केली. अखेरच्या दिवसांतही ते एका दलित व्यक्तीला वाचवण्यासाठी धावले. असा प्रसंग भविष्यात कुणावरही येऊ नये."
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या - प्रकाश सोळंके
धनजंय मुंडे यांनी पालकमंत्रिपदाचे अधिकार मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनावर वचक निर्माण केला. त्यांचे लोक गोदावरी नदीतून शेकडो ट्रक वाळूचा अवैध उपसा करतात. त्यामुळे या वाल्मिक कराडच्या पाठीशी असणारे धनंजय मुंडे मंत्रिपदी असेपर्यंत या प्रकरणाचा योग्य तपास होणार नाही.
कुणीही न्यायाची अपेक्षा करू शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाचा निष्पक्षपणे तपास होण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, ही बीडमधील सर्वसामान्य माणसांची मागणी आहे, अशा शब्दांत आमदार
प्रकाश सोळंके यांनी मुंडेंवर प्रहार केला.
वाल्मिक कराडला अटक करा - संदीप क्षीरसागर
वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली. "संतोष देशमुख हे बौद्ध समाजाच्या मुलासाठी पुढे आले होते. या मोर्चात कोणतेच राजकारण नाही. वाल्मिक कराडच्या गुंडांकडूनच देशमुख यांची हत्या झाली. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन शिक्षा होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी क्षीरसागर यांनी केली.
मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे - बजरंग सोनवणे
बीड जिल्ह्यात आज कायदा-सुव्यवस्था नावाला राहिली नाही. २० दिवस उलटले, पण संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागला नाही. याप्रकरणी केवळ आश्वासन दिले जात आहे. चौथा आरोपी अटक झाला की सरेंडर झाला हे अजून समजले नाही. वाल्मिक कराड या प्रकरणातील आका आहे, तर त्याचा सूत्रधार हे धनंजय मुंडे आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. देशमुख यांना अत्यंत निघृणपणे मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली.
सत्य महत्त्वाचे असते, सत्ता नाही हे दाखवा - बच्चू कडू
या घटनेत रस्त्यावरील गुंडागर्दी आणि खाकीतील गुंडागर्दी दोन्ही सहभागी असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, ही म्हण अधोरेखित करायची नसेल तर कारवाई अतिशय पारदर्शकपणे व्हायला हवी, असे मुख्यमंत्र्यांना माझे आवाहन आहे. सत्य महत्त्वाचे असते, सत्ता नाही, हे दाखवण्याची वेळ आली आहे. अन्यथा सत्ताधाऱ्यांना हे प्रकरण खूप महागात पडेल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.
अजितदादा, धमक असेल तर करेक्ट कार्यक्रम करा - संभाजीराजे
वाल्मिक कराडचा आश्रयदाता धनंजय मुंडे आहे, हे मी नाव घेऊन सांगत आहे. बीडमध्ये आता दहशत खपवून घेणार नाही. धनंजय मुंडेला मंत्रिपद देऊ नका, हे मी त्यावेळी सांगितले होते. धनंजय मुंडेंला पालकमंत्री केले, तर छत्रपती घराणे बीडचे पालकत्व घेईल. सरकारला तीन आरोपी अजून सापडत नाहीत. आपल्याला बीडचे बिहार करायचा आहे का? नाही ना, मग आता आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. परखडपणे काम करण्याची पद्धत असलेल्या अजितदादांमध्ये धमक असेल किंवा तुमच्यात हिंमत असेल तर या मंत्र्याला सर्वात आधी मंत्रिमंडळातून हाकलून लावा, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली.
....तर आम्हाला दंडुका हातात घ्यावा लागेल - मनोज जरांगे
संतोष देशमुख यांच्या आरोपींना तातडीने अटक करा. ज्यांनी आरोपींना पळवून लावले, त्या नेते-मंत्र्यांनाही अटक करा. तुम्ही - जातीयवादी मंत्र्यांना पोसणार असाल, तर - आम्हाला दंडुके हातात घ्यावे लागतील. प्रत्येक - वेळी आंदोलन करण्याची गरज नाही. विरोधी आणि सत्ताधारी आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी आणि ज्यांची ज्यांची - नावे घेतली गेली आहेत, त्यांना अटक करा, असे - सांगावे. जातीयवादी मंत्री तुम्ही सांभाळणार असाल आणि साधे चिलटे तुम्हाला धरता येत नाहीत, तर अवघड आहे. मग आम्ही खवळलो, तर नावे ठेवू नका, असा घणाघात मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केला.
पालकमंत्र्यांनी बीडचा सत्यानाश केला - आव्हाड
बीडचे पालकमंत्री व पोलिसांनी मिळून जिल्ह्याचा सत्यानाश केला. बीडच्या राजकारणाला पूर्वी जातीचा स्पर्श नव्हता. पण - आता चित्र बदलले आहे. आता बीडमधील - 'वाल्यांना' थांबवण्याची वेळ आली आहे. - नाहीतर महाराष्ट्रात सर्वत्र असे लोक तयार होतील. या वाल्याने अनेक लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. बीडमधील 'आका'चा जो बाप आहे, त्याला आधी मंत्रिमंडळातून बाहेर काढा, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.