संतोष देशमुख हत्या प्रकरण : फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, असे आदेश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला दिले आहेत. बीड जिल्ह्यात ज्या लोकांचे बंदुकींसोबतचे फोटो समोर येत आहेत, त्यांची खातरजमा करून त्यांचा शस्त्र परवाना जप्त करा, असे आदेशही फडणवीस यांनी बीड पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, असे आदेश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला दिले आहेत. बीड जिल्ह्यात ज्या लोकांचे बंदुकींसोबतचे फोटो समोर येत आहेत, त्यांची खातरजमा करून त्यांचा शस्त्र परवाना जप्त करा, असे आदेशही फडणवीस यांनी बीड पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. घटनेला जवळपास १९ दिवस उलटले, तरी अद्याप फरार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, असे आदेश सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना दिले आहेत.

संतोष देशमुख हत्याकांडातील जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत. जयराम चाटे आणि महेश केदार या दोन आरोपींना तांबवा या - गावातून ताब्यात घेतले होते. प्रतीक घुले याला स्थानिक गुन्हे शाखेने पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेतले, तर विष्णू चाटे याला बीड येथे महामार्गावर पाठलाग करून बेड्या ठोकल्या होत्या.

फरार तीन आरोपींची हत्या - दमानिया

“काल रात्री एका अज्ञात व्यक्तीने फोन करून मला सांगितले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आता कधीच सापडणार नाहीत, कारण त्यांची हत्या झाली आहे. हे ऐकून मी हबकलेच. तसेच या तिघांचे मृतदेह कुठे पुरले? याचीही माहिती समोरच्या व्यक्तीने दिली आहे. ही माहिती मी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना दिली आहे, असे अंजली दमानिया यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in