संतोष देशमुख हत्या प्रकरण : सर्व आरोपींवर मकोका; वाल्मिक कराडचे नाव नाही

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपीवर पोलिसांनी शनिवारी मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एकूण सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. राज्यातील मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटचा साथीदार असलेल्या वाल्मिक कराड याला...
संतोष देशमुख
संतोष देशमुखसंग्रहित छायाचित्र
Published on

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपीवर पोलिसांनी शनिवारी मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राज्यातील मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटचा साथीदार असलेल्या वाल्मिक कराड याला खंडणीप्रकरणी अटक करण्यात आल्याने त्याच्यावर मकोका लावण्यात आला नसल्याचे समजते.

कराड याच्यावरही मकोकाअंतर्गत कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. पोलिसांनी मकोका लावलेल्या आरोपींमध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सुधीर घुले, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे. तसेच वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला नाही. वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आल्याने त्याच्यावर मकोका लावण्यात आला नसल्याची माहिती आहे.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर महिनाभरानंतरही आरोपींवर कारवाई न केल्यामुळे जनआक्रोश मोर्चे निघाले. बीड, धाराशिव, परभणी, पुणे आणि वाशिमसह राज्यभरात निदर्शने करण्यात आली. प्रशासनाकडून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात येत होते. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी सात आरोपींवर मकोका लावण्यात आला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला महिना उलटला असला तरी मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. फरार कृष्णा आंधळे याच्यावर पोलिसांनी मकोका लावला आहे. कृष्णा आंधळेचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके तैनात करण्यात आली असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. कृष्णा आंधळे पोलिसांना गुंगारा देत आहे. आंधळे याचे बँक खाते गोठविण्यात आले आहे. तसेच त्याच्या निकटवर्तीयांचीही चौकशी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मकोकाअंतर्गत कारवाई करण्याचे सूतोवाच काही दिवसांपूर्वीच केले होते. संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशत निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर या कायद्यांतर्गत आता कारवाई होणार आहे. आरोपी प्रतीक घुले, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे आणि महेश केदार यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, तर हत्या प्रकरणात सिद्धार्थ सोनवणेलाही आरोपी करण्यात आले आहे.

सरपंच हत्या प्रकरणावरून कारवाईची मागणी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात सभागृहात निवेदन सादर केले होते. आम्ही कोणालाही सोडणार नाही आणि वेळ पडली तर आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार आता पोलीस प्रशासनाकडून हत्येच्या गुन्ह्यातील आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in