
पुणे : बीड जिह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात शनिवारी पहाटे बालेवाडी परिसरातून दोघांना अटक करण्यात आली. देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ही कारवाई केली.
सुदर्शन घुले, सुधीर सांगळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. देशमुख यांच्या हत्याप्रकरणात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या तिघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. मात्र, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि संतोष आंधळे हे तीन आरोपी फरारी होते. त्यांना पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी डॉ. संभाजी वायबसे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. पसार आरोपी पुण्यातील बालेवाडी परिसरात असल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल परिसरातील एका खोलीतून घुले आणि सांगळे यांना ताब्यात घेतले, तर आंधळे तेथून पसार झाल्याची माहिती मिळाली.
१४ दिवसांची सीआयडी कोठडी
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना कोर्टाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद झाला आणि त्यानंतर न्यायालयाने तीनही आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.
संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आता रविवारी पुण्यात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे. देशमुख हत्याप्रकरणी आधी बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर शनिवारी परभणीत मोर्चा काढण्यात आला. बीड, परभणीनंतर आता पुण्यात मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. मोर्चात मराठा बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या मोर्चासाठी आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर हे देखील उपस्थित राहणार आहेत.
मुंडे यांची हकालपट्टी करा - प्रकाश सोळंके
दोन आरोपींना पकडण्यात आल्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याच्या मागणीने अधिक जोर धरला आहे. मुंडे पालकमंत्री असताना आपले सर्व अधिकार त्यांनी वाल्मिक कराड याला दिले होते. त्यामुळे कराड हा सत्तेचे घटनाबाह्य केंद्र झाला होता. त्याच्या माध्यमातून सर्व गुंडगिरी, खंडणी आणि जिल्ह्यातील सामाजिक वातावरण बिघडून गेले. त्यामुळे हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदापासून स्वतः दूर व्हावे आणि ते स्वतःहून दूर होणार नसतील तर आमच्या पक्षनेतृत्वाने त्यांना मंत्रिपद सोडण्यास भाग पाडावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे.
परभणीत सर्वपक्षीय जनआक्रोश
परभणी : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीत शनिवारी सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येऊन त्यात जनआक्रोश व्यक्त करण्यात आला. या हत्येमागील आरोपींना पुण्यात कोणी मदत केली. या आरोपींना मदत करणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून कधी हाकलणार, असे सवाल करीत परभणी येथील मोर्चास संबोधित करणाऱ्या सर्वच नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आणि हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
परभणी येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून दुपारी १२.३० वाजता काढण्यात आलेल्या या मोर्चात जिल्ह्यातून आलेले हजारो नागरिक सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह स्थानिक नेतेमंडळी व बीड जिल्ह्यातून आलेल्या नेत्यांनीही सहभाग नोंदविला. स्थानिकच्या सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. या मोर्चात अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी विविध घोषणांचे फलक हाती घेऊन ही मंडळी सहभागी झाली होती. मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पोहचल्यानंतर दुपारी चार वाजेपर्यंत मान्यवरांची भाषणे झाली.