
आज बीड जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून अंबाजोगाईच्या दिशेने जाणारी एसटी बस ही बुटेनाथ परिसरातील घाटामध्ये पलटली. यामध्ये २० ते २५ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, ५ प्रवासी गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसटीचे ब्रेक फेल झाल्याने हा दुर्दैवी अपघात घडला.
बुटेनाथ घाटामध्ये बस पलटी झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांसोबत परिसरातील नागरिकांनीदेखील मदतकार्यात काम करून जखमींना बाहेर काढण्याचे काम केले. दरम्यान, या अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून यामध्ये अद्याप कोणीही दगावल्याची बातमी समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखून जागेवरच वळण घेत बस दरीमध्ये कोसळण्यापासून वाचवली. यामुळे मोठा अनर्थ टळला.