वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय! आभाळा एवढं दुःख पचवून १२ वीच्या परीक्षेत वैभवी देशमुखचं घवघवीत यश, नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव

तोंडावर बोर्डाची परीक्षा असूनही बापाला न्याय मिळावा यासाठी लढवय्यी लेक सतत लोकप्रतिनिधीच्या भेटीगाठी घेत, न्यायाची विनंती करीत महाराष्ट्रभर फिरत होती. अचानक डोक्यावरील पितृछत्र हरवल्यानंतरही आणि घरची बेताची परिस्थिती असतानाही न डगमगता आयुष्याला नवी दिशा देऊ शकणाऱ्या बारावीच्या परिक्षेतील घवघवीत यश नुसते कौतुकास्पदच नाही तर आदर्शवत आहे, असे म्हणत नेटकरी वैभवीच्या जिद्दीला सलाम ठोकत आहेत.
वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय! आभाळा एवढं दुःख पचवून १२ वीच्या परीक्षेत वैभवी देशमुखचं घवघवीत यश, नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव
फोटो सौजन्य : X (@SANKETPSHINDE)
Published on

महाराष्ट्रातील बीड जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर हा जिल्हा अतिशय संवेदनशील बनलाय. देशमुख यांची गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा भलामोठा डोंगर कोसळला. तोंडावर बोर्डाची परीक्षा असूनही बापाला न्याय मिळावा यासाठी लढवय्यी लेक सतत लोकप्रतिनिधीच्या भेटीगाठी घेत, न्यायाची विनंती करीत महाराष्ट्रभर फिरत होती. अखेर अशा खडतर परिस्थितीवरही मात करीत आज (दि.५) संतोष देशमुख यांच्या कन्येने, वैभवी देशमुख हिने १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे.

बारावीच्या परीक्षेत वैभवी देशमुखला ८५.३३ टक्के गुण मिळाले आहेत. या निकालानंतर तिने वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना मात्र वडिलांच्या आठवणीने ती गहिवरली. "आज खंत या गोष्टीची आहे की सर्वजण सोबत आहेत पण माझे वडील माझ्यासोबत नाहीत. त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडणार नाही...आजच नव्हेतर यापुढे कधीच पडणार नाही", असे ती म्हणाली.

वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार

पुढे बोलताना, "कालचा नीटचा पेपर अवघड गेलाय. त्याच्यात स्कोरिंग खूपच कमी येत आहे. पण मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे, अशी जिद्द तिने बोलून दाखवली. ज्यांनी वडिलांना मारले त्यांना लवकर फाशी द्यावी..एक आरोपी अद्यापही फरार आहे, त्याला अटक करावी, आमचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे." अशी मागणीही यावेळी वैभवीने पुन्हा एकदा केली. वैभवीला ६०० पैकी एकूण ५१२ गुण मिळाले आहेत. सर्वाधिक गुण तिला बायोलॉजीमध्ये (९८) मिळाले असून त्याखालोखाल गणितात ९४, केमिस्ट्रीमध्ये ९१, फिजिक्स आणि मराठीमध्ये ८३ तर इंग्रजीत ६३ गुण मिळालेत.

नुसते कौतुकास्पदच नाही तर आदर्शवत, सोशल मीडियातूनही अभिनंदन

निर्घुण हत्येमुळे अचानक डोक्यावरील पितृछत्र हरवल्यानंतरही आणि घरची बेताची परिस्थिती असतानाही न डगमगता आयुष्याला नवी दिशा देऊ शकणाऱ्या बारावीच्या परिक्षेत ८५.१३% गुण मिळवणे हे नुसते कौतुकास्पदच नाही तर आदर्शवत आहे, असे म्हणत नेटकरी वैभवीच्या जिद्दीला सलाम ठोकत आहेत. सामान्य नेटकऱ्यांसह अनेक राजकारणीही वैभवीच्या पाठीवर कौतुकाची थाप देत आहेत.

दरम्यान, यंदा राज्यात १२ वीच्या निकालाचा टक्का घसरला असून बारावीचे ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १.४९ टक्क्यांनी कमी झाले आहे. निकालात यंदाही राज्यातील मुलींनीच बाजी मारली. मुलींचा ९४.५८ टक्के आणि मुलांचा ८९.५१ टक्के निकाल लागला आहे. विभागनिहाय निकालात कोकण विभाग ९७.९९ टक्क्यांसह अव्वल स्थानी आहे. तर लातूर विभागाचा सर्वात कमी ८९.४६ टक्के निकाल लागला आहे.

logo
marathi.freepressjournal.in