बीडमध्ये पोलिसांच्या टेबल, नेमप्लेटवरून आडनाव हटवणार; बीडच्या पोलीस अधीक्षकांचा निर्णय

बीडमध्ये पोलिस अधीक्षकांपासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांच्याच टेबलांवरील आणि छातीवरील नेमप्लेटमधून त्यांचे आडनाव हटवले जाणार आहे.
बीडमध्ये पोलिसांच्या टेबल, नेमप्लेटवरून आडनाव हटवणार; बीडच्या पोलीस अधीक्षकांचा निर्णय
एक्स @airnews_mumbai
Published on

बीड : बीडमध्ये पोलिस अधीक्षकांपासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांच्याच टेबलांवरील आणि छातीवरील नेमप्लेटमधून त्यांचे आडनाव हटवले जाणार आहे. त्याऐवजी फक्त नावाचा वापर केला जाणार आहे, असा निर्णय बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घेतला आहे.

नवनीत कॉवत यांनी पोलिसांनी एकमेकांना आडनावाऐवजी केवळ नावानेच हाक मारावी, असे सांगितले होते. यानंतर त्यांनी पोलिसांच्या छातीवर असलेल्या नेमप्लेटवरील आडनावंही हटवली होती. यानंतर आता बीड पोलिसांच्या नेमप्लेटसह टेबलावरही फक्त त्यांची नावे आणि पदं नमूद करण्यात आली आहेत.

प्रत्येक जिल्ह्यात तिथल्याच तालुक्यांमधील, गावांमधील तरुण पोलीस खात्यात भरती होत असतात. विविध समाजातील तरुण पोलिसात सहभागी होतात. ते आपापल्या जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करत असतात. आम्ही पोलीस खात्यात काम करतो. म्हणजेच देशासाठी काम करत असतो. त्यामुळे आमची कुठलीही जात नसते, आमचा कुठलाही धर्म नसतो. आम्ही कुठल्याही नागरिकाला त्याची जात अथवा त्याचा धर्म पाहून न्याय देण्याची भूमिका घेत नाही. यामुळे कर्तव्यामधून जात काढून टाकण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलं. त्यापूर्वी आम्ही पोलिसांनी एकमेकांना नावाने हाक मारायचा उपक्रम राबवला. आता पोलिसांच्या नेमप्लेटवरून आडनावं काढून केवळ नावं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक कॉवत यांनी दिली.

बीडमध्ये वाढलेला जातीय तणाव कमी करायला पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी नवा पायंडा पाडला आहे. आम्हा पोलिसांची कुठलीही जात नाही. आमचा कुठलाही धर्म नाही. आम्ही सर्वांसाठी केवळ खाकी आहोत. आम्ही जेव्हा बंदोबस्तानिमित्त जिल्ह्यात फिरतो, तेव्हा अनेकजण आमच्या छातीवर असलेल्या नेमप्लेटवरील आमचं आडनाव वाचून आमच्याशी कसं वागायचं हे ठरवतात. आम्ही त्यांच्याशी कसे वागू याचा स्वतःच वाट्टेल तसा अर्थ लावतात. ते आम्हाला थांबवायचं आहे, असेही नवनीत कॉवत यांनी सांगितले.

आमचे पोलीस बीडच्या जनतेसाठी काम करतात. लोकांसाठी आम्ही फक्त पोलीस आहोत.

logo
marathi.freepressjournal.in