
पुणे : राज्यात वाढणाऱ्या जीबीएस आजारामागे ‘सी. जेजुनी’ (कॅम्पिलोबॅक्टर) हा विषाणू असल्याचा दावा पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेने केला आहे. महाराष्ट्रात जीबीएस रुग्णांची संख्या २०५ वर गेली आहे.
पुण्यातील जीबीएस रुग्णांच्या तपासणीत २० ते ३० टक्के प्रकरणात ‘सी. जेजुनी’ हा जीवाणू आढळला. ही चाचणी राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये केली. ‘सी. जेजुनी’ जीवाणूमुळे सर्वसाधारणपणे पोटात संक्रमण वाढते. यामुळे जीबीएस आजार होतो. हा जीवाणू दूषित पाणी व खाद्यपदार्थात असतो. राज्यात आतापर्यंत २०५ रुग्ण आढळले असून त्यातील १७७ जणांना जीबीएस झाला आहे. आतापर्यंत ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून २० रुग्ण हे व्हेंटीलेटरवर आहेत.
जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील नांदेड सिटी गृहनिर्माण सोसायटीतील आहेत. येथील पाण्याचे नमुने घेतले असता त्यात ‘सी. जेजुनी’ जीवाणू सापडला. हा पाण्यातील एक जीवाणू आहे.राष्ट्रीय विषाणू संस्थेने सांगितले की, नांदेड व परिसरात जीबीएस हा प्रदूषित पाण्यामुळे फैलावला आहे. पुणे मनपाने नांदेड व आजुबाजूच्या परिसरातील ११ खासगी आरओ प्लांटसह ३० प्लांट सील केले आहेत.
महागडे उपचार
जीबीएसचे उपचार महागडे आहेत. या आजारात रुग्णांना ‘आयव्हीआयजी’ हे इंजेक्शन द्यावे लागते. खासगी रुग्णालयात या एका इंजेक्शनची किंमत २० हजार रुपये आहे.