अरविंद गुरव/पेण
मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा लाभ पेण मधील महिलांना मिळाल्याचे समजताच या योजनेला चुनावी जुमला समजणाऱ्या महिलांनी देखील या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी सीएससी सेंटर, सायबर कॅफे आणि सेतू कार्यालयात गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. योजनेचे पैसे जमा झाल्याचा मॅसेज आल्यावर महिलांनी सरकारी बँकांमध्ये तोबा गर्दी केली होती. यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांवर कमालीचा ताण पडल्याचे देखील पहायला मिळाले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असल्याची वार्ता समजल्यानंतर, रायगड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. चाचपणीसाठी काही नेमक्याच महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे. मात्र आजपासून अधिकृतपणे सरकारकडून ही योजना सुरू होणार असल्यामुळे पेणमधील महिलांनी अंगणवाडी आणि शासकीय कार्यालयात गर्दी केली होती. राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. रक्षाबंधनच्या आधीच ओवाळणी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे सगळीकडे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातून सव्वातीन लाख अर्ज वैध ठरले आहेत. काही महिलांच्या खात्यामध्ये १५ ऑगस्टलाच प्रायोगिक तत्वावर दोन हप्ते म्हणजे ३ हजार रुपये जमा करण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या दिवसी १६ ऑगस्टला अनेक बँकामध्ये महिलांची गर्दी दिसून आली. काही आपल्या खात्यात रक्कम जमा झाली आहे का ? याचीही चौकशी करताना दिसत होत्या. लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सीएससी सेंटर, सायबर कॅफे आणि सेतू कार्यालय, महिला व बाल विकास कार्यालय या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती.
पुन्हा अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू
शासनाने कागदपत्रांची अट शिथिल केल्यानंतर लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले. १५ ऑगस्टपूर्वी अर्ज दाखल केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे ३ हजार जमा होणार आहेत. ज्यांनी उशिरा अर्ज दाखल केलेत, अर्ज केले नाहीत, असे लाभार्थी व ज्यांनी अर्ज करूनही त्रुटी राहिल्या आहेत, अशा लाभार्थ्यांचे पुन्हा अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा होऊ लागल्याने, या योजनेला गांभीर्याने न घेतलेल्या बहिणींची धावाधाव झाली आहे. तर ज्या महिलांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा झाली आहे, अशा महिला मात्र भलत्याच खुश झाल्या आहेत.