बंगळुरू-मुंबई एक्स्प्रेसला पश्चिम महाराष्ट्रात थांबा; उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मोठा दिलासा

उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागाने बंगळुरू ते मुंबई दरम्यान नवी द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस गाडी सुरू केली आहे.
बंगळुरू-मुंबई एक्स्प्रेसला पश्चिम महाराष्ट्रात थांबा; उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मोठा दिलासा
बंगळुरू-मुंबई एक्स्प्रेसला पश्चिम महाराष्ट्रात थांबा; उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मोठा दिलासा(Photo-X/@RailMinIndia)
Published on

कराड : उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागाने बंगळुरू ते मुंबई दरम्यान नवी द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस गाडी सुरू केली आहे. येत्या मंगळवार, १९ मेपासून ही गाडी आठवड्यातून दोन वेळा धावणार असून रेल्वे प्रशासनाने तिचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

ही गाडी हुबळी, बेळगाव, मिरज, सांगली, कराड, सातारा आणि पुणे मार्गे धावणार असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे सध्या उपलब्ध गाड्यांवरील गर्दी कमी होऊन प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गाडी क्रमांक १६५५३/१६५५४ एसएमव्हीबी बंगळुरू – लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) – एसएमव्हीबी बंगळुरू एक्स्प्रेस अशी या गाडीची ओळख आहे. या नव्या गाडीमुळे मिरज, सांगली, कराड, सातारा आणि पुणे येथील प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली आहे. मात्र, ही सेवा नियमित करून दररोज दोन्ही बाजूंनी सुरू करण्याची मागणीही होत आहे.

सातारा आणि सांगली परिसरातील प्रवाशांना थेट मुंबई आणि बंगळुरूसाठी सोयीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. विशेषतः आयटी क्षेत्र, शिक्षण आणि व्यावसायिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. मुंबईसह दक्षिण भारतात जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य गोपाल तिवारी यांनी सांगितले.

असे आहे गाडीचे वेळापत्रक

गाडी क्र. १६५५३ (बंगळुरू–मुंबई) :

  • प्रत्येक मंगळवार आणि शनिवार

  • बंगळुरू प्रस्थान : सायंकाळी ८.३५ वा.

  • कराड आगमन : दुसऱ्या दिवशी दुपारी १२.०२ वा.

  • सातारा : दुपारी १.०७ वा.

  • पुणे आगमन : सायंकाळी ४.५० वा.

  • मुंबई आगमन : रात्री ८.४० वा.

गाडी क्र. १६५५४ (मुंबई–बंगळुरू) :

  • प्रत्येक रविवार आणि बुधवार

  • मुंबई प्रस्थान : रात्री ८.४० वा.

  • पुणे आगमन : पहाटे ३.०० वा.

  • सातारा : सकाळी ५.५७ वा.

  • कराड : सकाळी ६.५२ वा.

  • सांगली : सकाळी ८.२२ वा.

  • मिरज : सकाळी ९.२५ वा.

  • बंगळूर आगमन : दुसऱ्या दिवशी रात्री १०.३० वा.

logo
marathi.freepressjournal.in