
मुंबई येथून एक महिन्यापूर्वी बंगळूरु (कर्नाटक) येथे पत्नीसह राहण्यासाठी गेलेल्या पतीने पत्नीची बंगळुरुमध्ये चाकूने भोसकून बुधवारी (दि. २६) रोजी हत्या केली होती. पत्नीची चाकूने भोकसून हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून तो बाथरूममध्ये ठेऊन मुंबईच्या दिशेने पळून निघालेल्या आरोपी पतीला साताऱ्याच्या शिरवळ पोलिसांनी शिरवळ येथून ताब्यात घेतले.मात्र तत्पूर्वी त्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्याने त्याला शिरवळ येथील खासगी रुग्णालयात व त्यानंतर शिरवळ पोलिसांनी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते,उपचारादरम्यान तो बरा झाल्यानंतर आज शुक्रवारी त्याला बंगळूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.राकेश राजेंद्र खेडेकर (वय ३५, रा. जोगेश्वरी, मुंबई) असे खून केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे तर गौरी सांबरेकर (वय ३२) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.
राकेश राजेंद्र खेडेकर आणि त्याची पत्नी गौरी सांबरेकर हे दोघे मुंबईतील जोगेश्वरी भागात राहत होते.मात्र महिनाभरापूर्वीच राकेश आणि गौरी हे दोघे बंगळुरुला राहायला गेले होते.हे दोघे दक्षिण बंगळुरुतील दोड्डकम्मानहल्ली परिसरातील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते.राकेश हा एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून व सध्या वर्क फ्रॉम होमचे काम करीत होता तर त्याची पत्नी गौरी जॉबच्या शोधात होती. बुधवारी २६ मार्च रोजी रात्री राकेश याच्याकडे पत्नी गौरी हिने पुन्हा मुंबईला जाण्याचा आग्रह धरला. दोघांच्यामध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला व वादाचे रूपांतर भांडणात होत नंतर गौरी घरातील भांडी आपटू लागली. तेव्हा पती राकेशने आपण आता राहत असलेल्या रूमचे डिपॉझिट भरलेले आहे,आपण जर रूम सोडली तर डिपॉझिटचे पैसे मिळणार नाहीत व येथे येण्यासाठी खूप खर्च झाला आहे, असे तिला समजावीत होता. तरीही गौरी आणि राकेश त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. शेवटी त्याचा राग राकेशला आल्याने राकेशने तिच्या घरातील चाकू घेऊन पत्नी गौरीचे मानेवर, गळ्यावर पाठीवर चाकूने वार करत तिला गंभीर जखमी केले.गौरी जखमी अवस्थेत घराचे लॉबीमध्ये निपचिप पडली.त्यानंतर राकेशला तीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर राकेशने घरातील मोठी बॅग रिकामी करून त्यामध्ये पत्नी गौरीचा मृतदेह ठेवून बॅगेची चेन लावली व ती बॅग घरातील बाथरूममध्ये नेऊन ठेवली.त्यानंतर गुरू. २७ मार्च मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास राकेश याने त्याचे साहित्य सोबत घेऊन त्याचे मालकीची होंडा सिटी कार घेऊन जोगेश्वरी मुंबई येथे जाण्याकरता बेंगलोर येथून रवाना झाला.
हत्येनंतर गौरीचा मृतदेह बॅगेत ठेवला…
गौरी जखमी अवस्थेत घराचे लॉबीमध्ये निपचिप पडली. त्यानंतर राकेशला तीचा मृत्यू झाल्याची खात्री झाली. त्यानंतर राकेशने घरातील मोठी बॅग रिकामी करून त्यामध्ये पत्नी गौरीचा मृतदेह ठेवून बॅगेची चेन लावली व ती बॅग घरातील बाथरूम बाहेर नेऊन ठेवली. त्यानंतर गुरूवारी २७ मार्च रात्री १२ वाजण्याच्या सुमारास राकेश त्याचे साहित्य सोबत घेऊन त्याचे मालकीची कार घेऊन जोगेश्वरी मुंबई येथे जाण्याकरता बेंगलोर येथून रवाना झाला. मात्र पत्नीचा खून केल्यामुळे राकेशला टेन्शन आल्याने त्याने महाराष्ट्रातील कागल, जि. कोल्हापूर येथे आल्यानंतर एका कीटकनाशके विक्री दुकानांमधून हार्पिक सनीफीनाईल व झुरळ मारण्याचे औषध घेतले व कारमध्ये ठेवले. कोल्हापूर ते कराड असा प्रवास करीत असताना राकेशने त्याचे बेंगलोर येथील फ्लॅट इमारतीमधील खालचे मजल्यावर राहणाऱ्या इसमाला व मुंबईत राहणाऱ्या वडिलांना फोन करून गौरीचा आपण खून केला असून तिचा मृतदेह बॅगेत ठेवल्याची माहिती दिली.त्यानंतर शिरवळजवळील खंबाटकी घाट उतरताच राकेशने विकत घेतलेले सर्व कीटकनाशके व विषारी औषधे एकत्र करून प्राशन केले.यावेळी तो सातारा जिल्ह्यतील खंडाळा तालुक्यातील खंबाटकीचा घाट उतरताच शिरवळ येथील महामार्गाकडेच्या निप्रो कंपनी जवळ कार घेऊन आला होता. विषारी औषधे प्राशन केल्याने यावेळी त्याला याचा त्रास होऊ लागल्याने राकेश कारमधून बाहेर येऊन महामार्गावर भररस्त्यात बसला. राकेश याला पाहून एका दुचाकीस्वाराने त्याची विचारपूस केली असता त्याने विषारी औषध पिल्याची माहिती दिली व रुग्णालयात दाखल करण्याची विनंती केली असता दुचाकीस्वाराने महामार्गावरील इतर लोकांच्या मदतीने राकेशला तात्काळ त्याच्याच कारमधून शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
चौकशीत खून केल्याची दिली कबुली
जोगळेकर हॉस्पिटलमध्ये राकेशवरती उपचार सुरू करण्यात आले व डॉक्टरांनी याची माहिती शिरवळ पोलिसांना दिल्यानंतर त्याठिकाणी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे,पोलीस हवालदार कुंभार यांच्यासह अन्य कर्मचारी घेऊन रुग्णालयात दाखल झाले. तेथे त्यांनी राकेशकडे अधिक चौकशी केली असता त्याने पत्नी गौरीचा खून केल्याची माहिती दिली.शिरवळ पोलीसांनी राकेशकडून आवश्यक सविस्तर माहिती घेऊन तात्काळ बेंगलोर पोलीसांशी संपर्क करून गौरीच्या खुनाबाबत खात्री केली.तसेच बंगलोर येथील संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी,पोलीस स्टेशन इन्चार्ज व इतर संबंधितांना फोनवरून सविस्तर माहिती दिली व पुढील तपासकामी सूचना दिल्या.तसेच शिरवळ पोलीसांनी त्यानंतर राकेशचे नातेवाईक व बेंगलोर येथील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना आरोपीबाबतची व उपचाराबाबतची माहिती दिली. दरम्यान, त्यानंतर राकेशला अधिक उपचाराची गरज असल्याचा सल्ला उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिल्याने पोलीसांनी त्याला तात्काळ पुणे येथील भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल व त्यानंतर शासकीय ससून हॉस्पिटल पुणे येथे उपचारा करता दाखल केले.बंगळूर येथील संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी,कर्मचारी ससून हॉस्पिटल येथे दाखल झाले.त्यांनी राकेश बरा झाल्याची डॉक्टरांकडून खात्री करून घेत त्याला ताब्यात घेतले. यावेळी,राकेशने बंगळुरु पोलिसांनाही चौकशीअंती आपण पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. बंगळुरु पोलिसांनी राकेशची कारही जप्त केली आहे.