

मुंबई : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देईपर्यंत त्यांना ९९ रुपयांत बसपास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ७ ऑगस्ट रोजी बेस्ट उपक्रमाचा वर्धापनदिन असून यादिवशी महापौर रितू तावडे यांच्या हस्ते पाच हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बसपासचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी दिली.
बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बसपास देण्याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ९९ रुपयांत बसपास देताना त्यांचा फोटो पासवर लावणे अपेक्षित आहे. यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी बेस्ट भवनात आल्यावर त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे मत बेस्ट समिती सदस्य नितीन नांदगावकर यांनी यावेळी मांडले. परंतु ‘चलो ॲप’च्या माध्यमातून बसपास देण्यास विरोध असल्याचे नांदगावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
माफक दरात प्रवास करता यावा, यासाठी ही योजना आणली आहे. परंतु ९९ रुपये एकदाच भरावे लागणार आहेत. चलो ॲॅपचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे का, असा सवाल सदस्य सुनील गणाचार्य यांनी उपस्थित केला.
बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग प्रवाशांना सवलतीत बसपास उपलब्ध करून देण्यात येतो. परंतु बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती खालावली असताना कर्मचारी सोबत असतात.
त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देणे गरजेचे आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी थकल्याने वारंवार उपक्रमाच्या कार्यालयात खेटे घालावे लागतात. हक्काची रक्कम थकल्याने कर्मचारी आर्थिक विवंचनेत असताना प्रवासाकरिता अनेक कर्मचाऱ्यांना पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत बसपास देण्याची मागणी होत होती.
बेस्टच्या नियमाप्रमाणे मोफत बसपास देण्यात येत नाही. त्यामुळे बेस्टने निवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षाला ९९ रुपये आकारून बसपास देण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑगस्ट २०२४ पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना या बसपासचा लाभ घेता येणार आहे.
५०० कोटींतून कर्मचाऱ्यांची देणी दिली
मुंबई महापालिकेने २०२६-२७ अर्थसंकल्पात बेस्टला १ हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. त्यापैकी ५०० कोटी बेस्टला दिले आहेत. या ५०० कोटींच्या रकमेतून बेस्टने ऑगस्ट २०२४ पर्यंत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ४६१ कोटी रुपयांची थकीत देणी अदा केली असल्याची माहिती बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी दिली. तसेच उर्वरित ५०० कोटी रुपयांकरिता महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली असल्याचे देखील सांगितले. साडेतीन हजार निवृत्त कर्मचाऱ्यांचे सुमारे १२०० कोटी रुपये अद्याप प्रलंबित आहेत.