मुंबई : आयपीएल क्रिकेट मॅचचा ‘फिव्हर’ दिवसेंदिवस वाढत असताना सट्टाबाजारही तेजीत सुरू आहे. विशेष म्हणजे आयपीएल क्रिकेट मॅचमध्ये सट्टा चालवणाऱ्यांना मुंबई पोलीसच मदत करीत आहेत, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी परिषदेत केला. तसेच पाकिस्तानी लोकांबरोबर सट्ट्याच्या संभाषणाचा ‘पेन ड्राईव्ह’ त्यांनी सभापती राम शिंदे यांना यावेळी सादर केला. तसेच शासकीय विभागातील घोटाळे, मंत्र्यांचा भ्रष्टाचार यावरून दानवे यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला.
आयपीएल सट्ट्यात मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन या व्यक्तींचा समावेश असून त्यांच्याकडून पाकिस्तानी खेळाडूंचा यासाठी वापर केला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ‘लोटस २४’ नावाच्या ॲपच्या माध्यमातून बेटिंग केल्यानंतर आता या सर्व व्यक्ती मुंबईत आयपीएलसाठी आल्याची माहिती दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणात सभागृहाला दिली.
राज्याच्या परिवहन, सिडको, महसूल, आरोग्य विभागातील घोटाळे, मंत्र्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, अधिकाऱ्यांचे घोटाळे सभागृहात सादर करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली. तसेच राज्याची आर्थिक स्थिती रसातळाला जात असल्याचे म्हणत दानवे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केला.
गुन्ह्यांचे प्रमाण वाढले
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कविता सादर करत, दानवे यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. राज्याने गेल्या दोन वर्षांपासून ‘क्राइम इन महाराष्ट्र’ अहवाल प्रसिद्ध केला नाही. राज्यात ५६४ विविध गुन्हे घडले, दंगलीच्या घटना घडल्या. नागपूर, पुणे, संभाजी नगरात बलात्काराच्या घटनांचा आलेख वाढला आहे. दररोज २२ बलात्कार, ४५ विनयभंगाच्या घटना घडल्या. कायद्याचा धाक नसल्यामुळे राज्यात गुन्ह्यांचे आणि सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
सर्वसामान्य मुलींची सुरक्षा वाऱ्यावर
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपी अद्याप पकडला जात नाही. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मानव आयोगाच्या अहवालात पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले. मंत्र्यांच्या परदेशात चाललेल्या मुलाचे विमान वळवले जाते. परंतु, सूर्यवंशीला मारहाण करणाऱ्या लोकांवर सरकार कारवाई करू शकत नाही, अशा शब्दांत दानवे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड काढली जात असेल, तर सर्वसामान्य मुलीची काय स्थिती असेल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.