नागपूर : राज्यात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत ४,८७२ अर्भकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती विधानसभेत देण्यात आली.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बुधवारी ही माहिती विधानसभेत दिली. ते म्हणाले की, ४,८७२ अर्भकांपैकी ७९५ म्हणजे १६ टक्के अर्भके ही श्वासोच्छवासाशी संबंधित आजारांमुळे मरण पावली. मुंबई, ठाणे, सोलापूर, अकोला आणि नंदुरबारमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले असेही त्यांनी सांगितले.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यानी त्यासंबंधात विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी माहिती दिली.
या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रात या अर्भकांचा मृत्यू झाला व मृत्यू झालेल्या अर्भकांचे वय शून्य ते २८ दिवसांच्या दरम्यान होते. मृत्यूच्या आकडेवारीनुसार, दररोज सरासरी २३ अर्भकांचा मृत्यू झाला आहे,असेही मंत्री म्हणाले.
महाराष्ट्रात ५२ विशेष नवजात शिशु काळजी कक्ष कार्यरत आहेत. सर्व आजारी अर्भकांना सरकारी रुग्णालयात औषधोपचार, चाचण्या आणि वाहतूक मोफत मिळते, असे त्यांनी सांगितले.