मेंढे जिंकणार की पडोळे..? भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ

सुरुवातीच्या काळात जरी हा मतदारसंघ काँग्रेसला साथ देत असला तरी नंतर या मतदारसंघावर भारतीय जनसंघाचे म्हणजेच आजच्या भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व होते. त्या काळात लक्ष्मणराव मानकर यांच्यानंतर महादेव शिवणकर यांनी मतदारसंघ सांभाळला होता.
मेंढे जिंकणार की पडोळे..? भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ

अविनाश पाठक/ नागपूर

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भाग मिळून बनलेला भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. विशेषतः गोंदिया जिल्ह्यात नक्षलवादी समस्या जास्त तीव्र आहे. या मतदारसंघातील यावेळच्या लोकसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य असे की जवळजवळ २५ वर्षांनंतर काँग्रेस पक्षाचे पंजा हे चिन्ह ईव्हीएम मशीनवर दिसणार आहे.

सुरुवातीच्या काळात जरी हा मतदारसंघ काँग्रेसला साथ देत असला तरी नंतर या मतदारसंघावर भारतीय जनसंघाचे म्हणजेच आजच्या भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व होते. त्या काळात लक्ष्मणराव मानकर यांच्यानंतर महादेव शिवणकर यांनी मतदारसंघ सांभाळला होता. पूर्वी या मतदारसंघातील बराच भाग चिमूर मतदारसंघाला जोडला गेला होता. नंतर २००९ पासून चिमूर परिसर गडचिरोली लोकसभा मतदारसंघात गेला आणि गोंदियाचा भाग भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात आला. कधी काँग्रेस तर कधी भाजप आणि नंतर कधी राष्ट्रवादी काँग्रेस असे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राहिले आहे.

मधली जवळजवळ २५ वर्षं या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच लोकसभा निवडणूक लढवत होती. त्यामुळे काँग्रेस इथे कधीच दिसत नव्हती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर प्रफुल्ल पटेल हे अजित पवार गटाकडे गेले आहेत. आता भाजपबरोबर अजित पवार गट असल्याने भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनाच महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये सुनील मेंढे विरुद्ध प्रफुल्ल पटेल यांच्यात झालेल्या लढतीत मेंढेंनी पटेलांचा पराभव केला होता.

या दोघांसह या मतदारसंघात एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात बसपाचे संजय कुंभलकर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. संजय कुंभलकर हे आधी भाजपमध्ये होते. मधल्या काळात त्यांना नगराध्यक्ष पदाची आलेली संधी देखील पक्षीय राजकारणामुळे हुकली. यावेळी लोकसभेची उमेदवारी मिळेल असे वाटत होते. मात्र सुनील मेंढेंनाच पुन्हा लॉटरी लागल्यामुळे कुंभलकर नाराज झाले, आणि त्यांनी बसपाचा आधार घेत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. हे बघता यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील निवडणूक तिरंगी होऊ शकते.

या मतदारसंघात १८ लाख २१ हजार मतदार आहेत. तर हा मतदारसंघ सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागाला गेला आहे. त्यातील भंडारा आणि गोंदिया विधानसभा क्षेत्रात अपक्ष आमदार आहेत. अर्थात सध्या ते दोघेही महायुतीसोबत आहेत. तुमसर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून ते प्रफुल्ल पटेलांसोबत आहेत. अर्जुनी मोरगावचे आमदारही प्रफुल्ल पटेलांसोबतच आहेत. तिरोड्यातील आमदार हे भाजपचेच आहेत. फक्त साकोली मतदारसंघ हा काँग्रेसकडे असून काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे इथले आमदार आहेत.

या मतदारसंघात कुणबी तेली आणि पोवार या समाजाचे वर्चस्व आहे. कुंभलकर हे तेली आहेत तर मेंढे आणि पडोळे हे कुणबी आहेत. जातीचे निकष लावले तर पवार समाज कोणाकडे वळतो त्यावर विजय निश्चित ठरणार आहे. आता मतदानाला जेमतेम दोन आठवडे उरले आहेत. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिकांची प्रचार सभा झाली. अमित शहा यांचीही प्रचारसभा ठरली होती. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती रद्द झाली. नाना पटोले आणि प्रफुल पटेल हे तर सभा घेतातच आहेत. नितीन गडकरींच्या ही सभा होत आहेत. त्यामुळे प्रचाराचे वातावरण तापू लागले आहे. अशावेळी तिरंगी लढतीत सुनील मेंढे मतदारसंघ पुन्हा राखणार का, की दीर्घकाळानंतर काँग्रेसचा खासदार गोंदियातून दिल्लीला जाणार याचे उत्तर मतदानानंतरच मिळणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही येथे लढविली होती निवडणूक

अगदी सुरुवातीला या मतदारसंघात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी काँग्रेसच्या राजकारणात बाबासाहेब पराभूत झाले होते. त्याचवेळी काँग्रेस हे जळते घर असल्याची टीका बाबासाहेबांनी केली होती.

पटेल परिवाराचेही वर्चस्व

भाजपसोबत या परिसरात पटेल परिवाराचे चांगलेच वर्चस्व आहे. प्रफुल्ल पटेल, त्यांचे वडील मनोहर भाई पटेल हे देखील येथून खासदार म्हणून निवडून आले होते.

logo
marathi.freepressjournal.in