मोदी सरकार पुन्हा आले तर निवडणुकाही होणार नाहीत - रमेश चेन्नीथला

भंडारा गोंदिया लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या भंडारा येथील प्रचारार्थ जाहीर सभेत चेन्नीथला बोलत होते. देशाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते, पण त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत.
मोदी सरकार पुन्हा आले तर निवडणुकाही 
होणार नाहीत - रमेश चेन्नीथला
Published on

भंडारा : भाजपाने केवळ हिंदू-मुस्लीम समाजात भांडणे लावून शांतता बिघडवण्याचे काम केले तर राहुल गांधी यांनी समाजात एकोपा रहावा यासाठी भारत जोडो यात्रा काढली. सर्वधर्मसमभावाची प्रेरणा घेऊन देश पुढे जात असताना भाजपने त्याला छेद दिला. देश सध्या कठीण प्रसंगातून जात आहे, देशाला कमजोर केले जात आहे. मोदी सरकार पुन्हा आले तर निवडणुकाही होणार नाहीत, हा धोका टाळण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार हटवून इंडिया आघाडीचे सरकार आणा, असे आवाहन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले.

भंडारा गोंदिया लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या भंडारा येथील प्रचारार्थ जाहीर सभेत चेन्नीथला बोलत होते. देशाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते, पण त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे, केंद्र सरकार नोकर भरती करत नाही, कंत्राटी पद्धतीने पदे भरत आहेत तर दुसरीकडे लाखो तरुण नोकरीपासून वंचित आहेत. महागाई कमी केली नाही, १५ लाख रुपये खात्यात जमा करणार अशा गॅरंटी दिल्या पण या सर्व मोदी गॅरंटी खोट्या निघाल्या, असाही दावा चेन्नीथला यांनी यावेळी केला.

यावेळी मंचावर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. मुकुल वासनिक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी खा. मधुकर कुकडे, काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे, माजी खा. खुशाल बोपचे, भंडारा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत देशकर, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई आदी उपस्थित होते.

‘राज्यघटना बदलण्याचा भाजपचा डाव’

यावेळी बोलताना खासदार मुकुल वासनिक म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन वाटचाल करत आहे. मात्र ते भाजपला नको आहे. राज्यघटना बदलण्याचा त्यांचा डाव आहे. भारतीय राजकारणावर मोठे संकट आले आहे, भाजपचे पुन्हा सरकार आले तर लोकशाहीचा अस्त होईल व तानाशाही सुरू होईल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना संपुष्टात येईल.

आदिवासींना संपवण्याचे भाजपचे काम

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपा सत्तेत आले तर २४ तासांत ओबीसी आरक्षण देतो अशी वल्गना देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, पण आरक्षण काही दिले नाही. भटक्या जाती, आदिवासी यांना संपवण्याचे काम भाजप करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in