
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) ही रविवारी महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यात होती. यावेळी छाप पाडली ती कोल्हापूरकरांनी. हलगी वादन, शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके आणि कुस्तीच्या लढतीने कोल्हापुरी बाणा झळकला. विशेष म्हणजे या यात्रेत फेटे परिधान करून तब्बल १० हजारांहुन अधिक कार्यकर्त्ये सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नियोजनाचे कौतुक करण्यात आले.
दि. १२ नोव्हेंबरला राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही हिंगोलीत दाखल झाली. यावेळी यात्रेत कोल्हापूर जिल्ह्याचा समतेचा, पुरोगामित्वाचा वसा घेऊन काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले. आखाडा बाळापूर येथून काही अंतरावर आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते राहुल गांधी यांना अंबाबाईची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले. सतेज पाटील यांच्यासमवेत आमदार जयंत आसगावकर, आमदार रुतुराज पाटील, आमदार राजू आवळे, कोल्हापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष गुलाबराव घोरपडे, प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर, कोल्हापूर शहराध्यक्ष सचिन चव्हाण हेदेखील उपस्थित होते.
पहाटे ५ पासूनच कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते भगवे फेटे परिधान करून भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. यात्रेमध्ये कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या कुस्तीचा फड रंगला. यावेळी राहुल गांधी कुस्ती कौशल्य जाणून घेतले. कोल्हापुरी शान असणारा कोल्हापुरी फेटा त्यांना घालण्यात आला. शिवकालीन युद्धकलेच्या थरारक प्रात्यक्षिकांनी कार्यकर्त्यांची मने जिंकली, तर लेझीमची लयदार प्रात्यक्षिके आकर्षण ठरली.