भास्कर जाधव यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला 

चिपळूण पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी बंदोबस्त तैनात केला आहे
भास्कर जाधव यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या रत्नागिरीतील चिपळूण येथील राहत्या घरावर अज्ञातांकडून मंगळवारी रात्री उशिरा हल्ला करण्यात आला. भास्कर जाधव यांच्या बंगल्यावर दगड, पेट्रोलच्या बाटल्या आणि स्टम्प्स फेकून मारण्यात आले. हल्ल्याचे नेमकं कारण पुढे आलेले नाही. या घटनेमुळे कोकणात तणाव निर्माण झाला आहे. चिपळूण पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी बंदोबस्त तैनात केला आहे.   

मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपामुळे कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबावर वैयक्तिक पातळीवर आरोप केले होते. त्याला राणे कुटुंबियांकडूनही त्याच भाषेत उत्तर दिले गेले. त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. नाईक यांना एसीबीने चौकशीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे राणे विरुद्ध ठाकरे गट संघर्ष चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच मंगळवारी रात्री आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाला. आमदार भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ल्याची रत्नागिरी पोलिसांनी तातडीने दखल घेतली. चिपळूण पोलिसांनी आमदार भास्कर जाधव यांच्या घराला भेट देत घराच्या आवारात सापडलेल्या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. अज्ञातांनी केलेला हल्ल्याचा प्रयत्न निष्फळ ठरला असला, तरी या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

राणेंवरील टीकेमुळे हल्ला?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भास्कर जाधव सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर तसेच नारायण राणेंवर सडकून टीका करत आहेत. सोमवारी सिंधुदुर्ग येथे झालेल्या जाहीरसभेतही भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांचा उल्लेख कोंबडीचोर असा करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. या राजकीय वादाची पार्श्वभूमी या हल्ल्यामागे तर नाहीना? अशीही शंका व्यक्त केली जात आहे. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

संतप्त शिवसैनिकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

आमदार भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी...’ अशा घोषणा देत मविआच्या कार्यकर्त्यांसह चिपळूण पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला व हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. कोणाच्या आदेशानुसार भास्कर जाधव यांची सुरक्षा काढण्यात आली, असा सवाल पोलीस अधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी विचारला.

‘ते’ आदेश गृहमंत्र्यांकडून - भास्कर जाधव

‘मंगळवारी रात्री अचानक माझ्या सुरक्षेत कपात करण्यात आली आणि माझ्या घरावर हल्ला झाला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असा प्रकार होईल, अशी मला अपेक्षा नव्हती. ते पोलीस खात्याचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्री असे काही करतील असे मला वाटत नाही. गृहमंत्र्यांकडून हे आदेश आले असावेत आणि माझे सुरक्षा कवच काढले असावे,” अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in