पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. सोमवारी (२९ एप्रिल) पुण्यात झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता 'भटकती आत्मा' असा उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला. मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'ज्या दिवशी मते मोजणी होईल, त्यावेळी नरेंद्र मोदींना कळेल की, ही भटकती आत्मा नाही तर, ही भारतातील आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे, असे जयंत पाटील इंदापूरच्या सभेत म्हणाले.
नेमके काय म्हणाले होते मोदी?
१९९५ मध्ये राज्यात सेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले. मात्र, ‘भटकती आत्मा’ तेव्हाही या सरकारला अस्थिर करण्याचा डाव खेळत होता. २०१९ मध्येही त्यांनी जनादेशाचा अपमान केला. महाराष्ट्रानंतर आता देश अस्थिर करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. महाराष्ट्राला अशा भटकत्या आत्म्यांपासून वाचविले पाहिजे. महाराष्ट्रात महायुती मजबूत आहे. या मजबुतीनेच त्यांनी पुढे जावे. मागच्या २५ ते ३० वर्षांत ज्या उणिवा राहिल्या. त्या आपण दूर करुया. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नक्कीच नवी झेप घेईल. त्याचबरोबर एनडीए आघाडी सरकार महाराष्ट्राला नवीन उंचीवर नेल्याशिवाय राहणार नाही, असे मोदी म्हणाले होते.
मतमोजणीनंतर मोदींना कळेल...
मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर जयंत पाटील म्हणाले, मोदींनी शरद पवार साहेबांना आत्माची उपमा दिली. ही भटकती आत्मा गेल्या ४५ वर्षापासून महाराष्ट्र अस्थिर करत आहे. पण, ज्या दिवशी मते मोजणी होईल, त्यावेळी नरेंद्र मोदींना कळेल की, ही भटकती आत्मा नाही तर, ही भारतातील आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे. महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद पवारांकडे आज सर्वजण बघत आहे.
रोहित पवारांची मोदींवर टीका
मोदींच्या टीकेला रोहित पवार यांनी देखील ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवार म्हणाले, "काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल! नांदतो केवळ पांडुरंग!! (संत एकनाथ महाराज) मोदीजी महाराष्ट्र हे आमचं शरीर म्हणजेच पंढरी आहे आणि विठ्ठल हा या पंढरीतला आत्मा आहे.. म्हणूनच स्वतःचं आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच तुम्हाला महाराष्ट्राची आठवण झाली, पण इथं येऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी तुम्हाला #अस्थिर_आत्मे दिसू लागले. आता ४ जूननंतर भाजप आणि मित्र पक्षांच्या अनेकांना निवांत हिमालयात जाऊन मन स्थिर करण्याची संधी देश देणार आहे", असे ते म्हणाले.
'या' उमेदवारांसाठी पुण्यात झाली मोदींची सभा
पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, बारामती लोकसभेच्या सुनेत्रा पवार, शिरुर लोकसभेचे शिवाजीराव आढळराव पाटील, मावळ लोकसभेचे श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची पुण्यात जाहीरसभा झाली.